Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2013, 2017 नंतर सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळणार आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद शमी आणि विराट कोहली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले तर कोहलीने धावांचा पाठलाग करताना संघाची जबाबदारी घेतली.
ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु भारताच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. शमीने 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
पाठलाग करताना विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही भारताच्या विजयाचा पाया रचला. कोहलीने 73 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने 45 धावा केल्या. त्यानंतर कोहलीसोबत अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. राहुल (42*) आणि हार्दिक पंड्या (28) यांनी संघाला विजय मिळवून दिला.
14 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवले
भारताने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात भारताने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते.