DNA मराठी

ताज्या बातम्या

Donald Trump

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump on India: भारतासोबत मोठी डील होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. अमेरिका आता काही मोठे व्यापार करार करणार आहे आणि त्यात भारतासोबतचा करार देखील समाविष्ट आहे. असं ट्रम्प म्हणाले. “बिग ब्युटीफुल बिल” या त्यांच्या कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “आम्ही चीनसोबत करार केला आहे आणि आता पुढचा मोठा करार भारतासोबत होऊ शकतो.” ट्रम्प पुढे म्हणाले, “प्रत्येकजण अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराचा भाग होऊ इच्छितो. परंतु आम्ही सर्वांशी व्यवहार करणार नाही. आम्ही काही मोठे करार करणार आहोत. आम्ही भारतासाठी दरवाजे उघडणार आहोत.” भारतासाठी दरवाजे उघडतील अमेरिका आणि चीनमधील दीर्घ व्यापार युद्धानंतर करार झाला असताना हे विधान आले आहे. अमेरिका आता भारतासोबतही आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसते. चीनसोबत कोणता करार झाला? ट्रम्प यांनी चीनसोबतच्या कराराची संपूर्ण माहिती दिली नसली तरी, व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की हा करार चीनमधून अमेरिकेत दुर्मिळ पृथ्वी घटकांची वाहतूक जलद करण्याबद्दल आहे. अमेरिका या दुर्मिळ धातूंसाठी मोठ्या प्रमाणात चीनवर अवलंबून आहे आणि आता त्यांचा पुरवठा सुरक्षित करू इच्छित आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराची पार्श्वभूमी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी आधीच सांगितले आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी म्हटले होते की, “आम्ही खूप जवळ आलो आहोत आणि लवकरच एक मजबूत व्यापार भागीदारीची घोषणा केली जाऊ शकते.” भारत आणि अमेरिका दोघेही आता एकमेकांसाठी धोरणात्मक भागीदार बनले आहेत, विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावामुळे. या कराराद्वारे, भारताला अमेरिकन बाजारपेठेत अधिक प्रवेश मिळू शकतो आणि अमेरिकेला भारतासारख्या मोठ्या ग्राहक देशात आपला व्यापार वाढवण्याची संधी देखील मिळेल.

भारतासोबत मोठी डील करणार, होणार फायदा; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा Read More »

IMG 20250625 WA0010 1024x682

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश

Ashish Shelar: गेल्या सहा महिन्यात मुंबईत 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केल्याचे महापालिका सांगत असली तरी ही बाब अत्यंत संशयास्पद असून गेल्या तीन महिन्यातील मोहीमेची चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका प्रशासनाला दिले. मुंबईत वाढत असलेले डेंग्यू मलेरियाचे रुग्ण आणि त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतची आढावा बैठक मंत्रालयात आशिष शेलार यांनी घेतली. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अमित सैनी, अभिजीत बांगर महापालिका कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा तसेच सरकारच्या आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते मुंबईत मलेरियाचे 1 जून ते 21 जून या कालावधीत 554 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 71 तर चिकनगुनियाचे 6, लेप्टोस्पायरसिस 24, गॅस्ट्रो 620 रुग्ण आढळून आले आहेत 2024 जानेवारी ते मे या कालखंडात मलेरियाचे 1612 रुग्ण आढळले होते तर यावर्षी 1973 रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचे 338 रुग्ण मागील वर्षी आढळून आले होते तर जानेवारी ते मे 2025 या कालखंडात 347 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेने 1 जून ते 21 जून 2025 या कालखंडामध्ये सहा लाख 39 हजार 430 घरांचे सर्वेक्षण केले असून एकूण 30 लाख 56 हजार 528 लोकांचे सर्वेक्षण केल्याचे महापालिकेने सांगितले. एकूण 1 लाख 2 हजार 243 रक्त नमुने गोळा केले असून लेप्टो संशयित रुग्णांची संख्या 62,484 आहे तर यासाठी 37 शिबिरे घेण्यात आली असून विविध कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन 5,108 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती दिली. तर गॅस्ट्रोसाठी वितरित केलेल्या ओआरएस गोळ्यांची एकूण संख्या 21,429 असून पाण्याच्या जंतू करण्यासाठी क्लोरीन टॅब चे वितरणाची संख्या 11, 086 आहे 1 जून ते 21 जून या कालावधीत ह्या उपायोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तसेच मलेरिया नियंत्रणासाठी 17 हजार 82 इमारतींची तपासणी केली केल्याची माहिती दिली. डास मारण्यासाठी 35 हजार 911 इमारतींच्या परिसरात धूर फवारणी करण्यात आली असून 5 लाख 58 हजार 261 झोपडपट्टी विभागात फवारणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपायोजना करूनही रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येत्या कालखंडामध्ये या सर्व उपाययोजना 25 टक्क्यांनी वाढवा असे निर्देश मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेने गेल्या सहा महिन्यात 2 लाख 50 हजार उंदरांचा खात्मा केला तर एक जून ते 21 जून या कालखंडामध्ये विषारी गोळ्या वापरून मारलेल्या मूळकांची संख्या 1741 तर पिंजरे लावून पकडलेल्या मोक्षकांची संख्या 2015 आहे. 17 वॉर्ड मध्ये 17 संस्था हे काम करतात तर पिंजरा लावून मुषक पकडण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात ही सर्व आकडेवारी एकूणच संशयास्पद असून उंदीर किती मारले? कुठे टाकले ? किती विभागात ती कारवाई करण्यात आली ? याचे चित्रीकरण करण्यात आले होते का ? या सर्वांची तीन महिन्याची चौकशी करण्यात यावी गेली अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक, विधान परिषदेत आमदार आणि तीन टर्म विधानसभेचा आमदार म्हणून मुंबईत काम करत असून ही आपल्याला अशा प्रकारचे उंदीर कधी मारल्याचे निदर्शनास आलेले नाही. पिंजरा कुठे लावला असे कधी पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे हे सर्वच प्रकरण संशयास्पद असून याची चौकशी करून अहवाल सादर करा असे निर्देश मंत्री शेलार यांनी यावेळी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

उंदीर मारण्याच्या मोहिमेची चौकशी करा, आशिष शेलार यांचे आदेश Read More »

Harshwardhan Sapkal

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.., हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

Harshwardhan Sapkal : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी केली आहे. ते टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील मतचोरीसंदर्भात ट्वीट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार वाढले हे आरटीआयमधून उघड झाले आहे. फडणवीसांविरोधात निवडणूक लढलेले काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी ही माहिती मागविली आहे. विशिष्ट मोबाईल नंबरवरून अनेक मतदारांची नोंद केल्याचेही स्पष्ट झालेले आहे. याची शहानिशा करावी असे निवडणूक आयोगाने सांगितले पण शहानिशा केलेली नाही. गुडदे पाटील यांनी न्यायालयात दोन याचिकाही दाखल केलेल्या आहेत. फडणवीस यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेला नाहीत. या मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करावी व चौकशी होईपर्यंत त्यांनी पदावरून दूर रहावे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. सरकारी जाहिरातीत राजमुद्रा गायब करून सेंगोल कसा? भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज आणीबाणी संदर्भात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत जाहिरातबाजी केली आहे. सरकारी जाहिरातीतून राजमुद्रा गायब असून सेंगोल दाखवला आहे. सेंगोल कशाचे प्रतिक आहे, हे वेगळे सांगायला नको. भाजपाला लोकशाही व संविधान संपवून गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. काँग्रेस मुख्यपत्र शिदोरीचा आणीबाणी विशेष अंक काँग्रेस पक्षाचे मुख्यपत्र जनमानसाची शिदोरी या मासिकाचा आणीबाणी विशेष अंक काढला आहे. या अंकात इंदिराजी गांधी, पुपुल जयकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, दैनिक सामनाचे संपादक व खा. संजय राऊत यांच्यासह अनेक ज्येष्ठ लेखकांनी लेख लिहिले आहेत. या अंकातून आणीबाणी संदर्भातील सत्य लोकांसमोर आणले जाणार असून भाजपच्या खोट्या प्रचाराला चोख उत्तर मिळेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. चांदीच्या ताटात पाहुणचार.. संसद व विधिमंडळ अंदाज समितीतील लोकांनी पाच हजार रुपयांचे शाही भोजन, ५५० रुपये भाड्याच्या चांदीच्या ताटात पाहुणचार झोडला तो धुळे विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेल्या अंदाज समितीच्या पैशातून होता का, असा प्रश्न विचारून अंदाज समितीच्या तमाशाचा हा दुसरा वग आहे. शाही पाहुणचार झोडून काटकसर कशी करायची, हे समितीने सांगितले असावे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला, लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत आणि मेजवाणी झोडण्यासाठी मात्र पैसे आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा.., हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी Read More »

Ravi Shankar Prasad 1024x683

आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ?भाजप नेते रविशंकर प्रसाद

Ravi Shankar Prasad : आणीबाणीत सर्व देशाचा तुरुंग बनवून विरोधी कार्यकर्त्यांचा छळ केल्याबद्दल, जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करुन सामान्य जनतेवर अत्याचार केल्याबद्दल काँग्रेस नेते माफी मागणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खा. रविशंकर प्रसाद यांनी केला. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. प्रसाद बोलत होते. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. अमित साटम, मुंबई भाजपा कोषाध्यक्ष किरीट भन्साळी, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. यावेळी खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणीत दीड लाख लोकांना देशभर अटक करण्यात आली होती. जनसंघ, समाजवादी अशा सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांना अटक करून हरयाणात तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याच तुरुंगात मोरारजीभाई देसाई यांनाही ठेवण्यात आले होते. मात्र या दोघांना भेटण्याची परवानगी नाकारली गेली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना, जनसंघाच्या कार्यकर्त्यांचा तुरुंगात शारीरिक छळ करण्यात आला होता . यावेळी खा. प्रसाद यांनी आणीबाणीत झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. खा. प्रसाद म्हणाले की, आणीबाणी काळात 253 पत्रकारांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 110 पत्रकारांना मिसा खाली तर 110 जणांना संरक्षणविषयक कायद्यानुसार अटक करण्यात आली. 33 जणांना अन्य गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. अनेक ज्येष्ठ संपादकांनाही अटक करण्यात आली होती. 52 विदेशी पत्रकारांची मान्यता रद्द करण्यात आली. ख्यातनाम पत्रकार मार्क टली सह 29 विदेशी पत्रकारांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली गेली. वृत्तपत्रांवर प्रसिद्धी पूर्व निर्बंध (प्री सेन्सॉर शिप) घालण्यात आले. सरकारी अधिकाऱ्यांना नसबंदीचे उद्दिष्ट ठरवून दिले जात असे. 60 लाख लोकांची जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनेकांचा विवाह झाला नसताना त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली, असेही खा. प्रसाद यांनी नमूद केले. या अत्याचाराबद्दल काँग्रेस नेत्यांनी आजवर माफी मागितली नाही, असेही खा. प्रसाद यांनी सांगितले.

आणीबाणीत संविधानाचा गळा घोटल्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का ?भाजप नेते रविशंकर प्रसाद Read More »

Ajit Pawar On Sangram Jagtap 1024x598

आमदार जगताप यांचे गैरसमज दूर करणार; अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट

Ajit Pawar On Sangram Jagtap: आम्ही भाजपसोबत असलो तरही आमचा पक्ष आंबेडकर, शाहू, फुले यांच्या विचारधाराचा असून समाजातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार असं आपल्या प्रत्येक भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नगर शहराचे आमदार संग्राम जगताप गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अजित पवार यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्ध मिळवण्याचे काम काही नेतेमंडळी करत आहे. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी काहींना काही वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहत असतात. तर यामध्ये नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा देखील समावेश होत असून एका विशिष्ट धर्माला लक्ष करून जगताप हिंदुत्ववादी राजकणार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आमदार संग्राम जगताप यांचे गैरसमज दूर करणार असून आमचा पक्ष सर्व धर्मसमभाव प्रमाणे काम करत असून पुढे देखील याच पद्धतीने काम करणार असल्याचे स्पष्ट मत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना मांडले. त्यामुळे आता येणाऱ्या काळात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आमदार जगताप यांचे गैरसमज दूर करणार; अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट Read More »

IMG 20250625 WA0002 1024x768

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन

Ahilyanagar News : तपोवन रोडवरील लक्ष्मीनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या त्रासाला कंटाळून परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या बैठकीस माजी नगरसेवक निखील वारे आणि बाळासाहेब पवार हेही उपस्थित होते. सयाजीराव वाव्हळ, नानासाहेब माळवदे, बंडोपंत ढोले, राजेंद्र डहाळे, संजय कांडेकर, रमेश चौधरी, किरण विरकर, संजय धामने, पोपटराव राठोड, प्रशांत फुगनर, सुरेश बोडखे, भानुदास दातीर, अशोक कोरडे, सुर्यकांत झेंडे आणि पत्रकार साहेबराव कोकणे यांनी नागरिकांचे म्हणणे मांडत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की, लक्ष्मीनगरमधील जलवाहिनी ही जुनी व गंजलेली आहे, त्यामुळे पुरेसा दाब मिळत नाही. फेज टू पाण्याकरिता सर्वांनी नियमाप्रमाणे शुल्क भरले असून नवीन नळजोडण्या देखील दिल्या गेल्या आहेत, मात्र अपेक्षित पाणीपुरवठा अद्याप मिळत नाही. यावर आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत काम लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लक्ष्मीनगरमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी आयुक्तांना दिले निवेदन Read More »

IMG 20250625 WA0001 1024x576

केडगावात लूटमार अन् हत्या, 3 जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ahilyanagar Police: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत केडगाव येथील अनोळखी व्यक्तीच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना 22 जून रोजी एक अनोळखी पुरूष जखमी अवस्थेत केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळया जागेत आढळला होता. या व्यक्तीला पुढील उचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केल्याने या प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन येथे वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीवरून बीएनएस कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करत असताना पोलिसांनी घटनाठिकाणचे जवळील व केडगाव ते कायनेटीक चौक, अहिल्यानगर मार्गावरील 20 ते 25 सीसीटीव्ही फुटेज तपासून संदेश संजय क्षेत्रे, अमन असीरमिया शेख आणि मंगेश कालीदत्त कांबळे, सर्व रा.केडगाव, अहिल्यानगर या आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मयताचे आधारकार्ड मिळून आले. आधारकार्डवरून मयत हा बोबडा अनारसिंग, रा.सुखपुरी, जैनाबाद, बुरहानपूर, मध्यप्रदेश असल्याचे निष्पन्न झाले. मयतास लुटमार करण्याच्या उद्देशाने लाकडी काठी व दगडाने मारहाण करण्यात आली असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे.

केडगावात लूटमार अन् हत्या, 3 जणांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई Read More »

IMG 20250625 WA0000 1024x576

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कान्हुबा येथे बेकायदेशीरपणे काही विघ्नसंतोषी लोक एकत्र येऊन धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करणार असल्याने त्यांना रोखण्याची मागणी जवखेडे खालसा मधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गात येऊन मुजावर यांना धमकावून आरती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कोणतीही विपरीत घटना घडणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पीर बाबा रमजान उर्फ कान्हुबा दर्गा आहे. या दर्गाच्या दिवा बत्तीसाठी मुस्लिम समाजाला पिढ्यानपिढ्या दीडशे वर्षापासून इनामी जमिनी मिळालेली आहे. शासनाच्या गॅजेटमध्ये देखील तसा उल्लेख असून, ॲलिनेशन रजिस्टरला याबाबतची नोंद आहे. परंतु गावातील काही विघ्नसंतोषी व गावाबाहेरील जातीवादी संघटनेचे लोक यामध्ये राजकारण करून तीन वर्षापासून दर्गावर येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, मुस्लिम समाजातील मुजावर यांना सदर दर्गातून शिवीगाळ करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक गुरुवारी सकाळी दर्गावर येऊन आरती करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाचे मुजावर यांना दमबाजी करुन दर्गा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात मुस्लिम समाज अल्प असून, त्यांच्यात भीतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत आहे. दर्गावर असलेला हिरवा झेंडा काढून, मजारवर भगवी चादर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या दर्गावर कधीही आरती झालेली नसून, दर्गावर आरती करण्याच्या उद्देशाने चिथावणी देऊन जमाव जमविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 19 जून रोजी दर्गातील मुजावर यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाची बैठक घेतली, मात्र मुस्लिम समाजावर दबाव टाकण्यात येत आहे. जातीय द्वेष पसरविण्यासाठी युवकांचे माथी भडकविण्याचे काम सुरु आहे. प्रशासन देखील यासंदर्भात सहकार्य करत नसून, विघ्नसंतोषी लोक दर्गाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा येथे जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यासाठी विघ्नसंतोषी लोकांना गैरकृत्य करण्यापासून रोखण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भैय्या शेख, शाहिद पठाण, डॉ परवेज अशरफी, फिरोज शेख, हुसेन शेख, शफिक शेख, शाकीर शेख, असिफ शेख, इरफान शेख, अन्वर शेख, आदींसह गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण द्या, मुस्लिम समाजाची मागणी Read More »

IMG 20250624 WA0005 1024x681

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Ajit Pawar: येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी पक्षाला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यात उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार महादेव बाबर यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला आहे. याशिवाय पुणे, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, नांदेड, हडपसर येथील विविध पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. महादेव बाबर यांनी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद शहरात वाढली आहे असं या वेळी अजित पवार म्हणाले. तसेच लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा करणार असून त्याअगोदर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे दौरा करतील असे जाहीर करतानाच आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला ते शिकवले आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यातून जनसामान्यांची कामे आपण करत आहोत असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पक्ष प्रवेश करणार्‍यांनी संघटना बळकट करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करायचे आहे. याशिवाय सभासद नोंदणीही मोठया प्रमाणात करायची आहे. आपल्याला राष्ट्रवादीचा परिवार म्हणून काम करायचे आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय करायचा आहे असेही अजित पवार म्हणाले. पक्षात घेताना कुणाचे वेडेवाकडे धंदे असू नये. त्यांची प्रतिष्ठा चांगली असली पाहिजे. महिला भगिनींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. संबंधितांनी कुठेही उर्मटपणे वागता कामा नये असे बजावतानाच शून्यातून विश्व निर्माण करता येते. कुठल्याही गोष्टीचा किंवा कामाचा कमीपणा वाटून घेता कामा नये असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराने सोडली साथ, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Read More »

ST Bus

Maharashtra News: एसटी महामंडळ तोट्यात; आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर

Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आर्थिक संकटावर एक श्वेतपत्रक जाहीर केले असून, या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला असल्याचे श्वेतपत्रिकेतून समोर आला आहे. हे श्वेतपत्रक सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचाऱ्यांसह इतर भागधारकांना MSRTC ची आर्थिक स्थिती पारदर्शकपणे समजावून देण्याच्या हेतूने प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात आगामी धोरण निर्णय, खर्चकपात योजना, तसेच महसूल वाढ व प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्याचे नियोजन नमूद करण्यात आले आहे. महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. महसूल वाढीच्या उपाययोजना श्वेतपत्रकानुसार, महसूल वाढवण्यासाठी MSRTC दरवर्षी ५,००० नवीन बस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. यामध्ये उच्च दर्जाच्या व्होल्वो बस भाडे तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. महामंडळाच्या मालकीच्या जागांवर खाजगी वाहनांसाठी इंधन पंप उभारण्यात येणार असून, त्यासाठी इंधन पुरवठादारांशी महसूल वाटप करार केले जाणार आहेत. तसेच, महामंडळाच्या मालमत्ता BOT (Build-Operate-Transfer) किंवा PPP (Public-Private Partnership) मॉडेलवर विकसित केल्या जाणार आहेत. सी-कॅटेगरी मार्गांचे बी-कॅटेगरीत व बी-कॅटेगरीचे ए-कॅटेगरीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गैर-परिचालन उत्पन्नात वाढ, प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावणे, आणि महसूल वाढीसाठी ठोस उद्दिष्टे निश्चित केली जाणार आहेत. खर्चकपात व कार्यक्षमतेसाठी उपाय खर्च कमी करण्यासाठी ५,००० LNG आणि १,००० CNG बस ताफ्यात समाविष्ट करण्याची योजना आहे. व्यवस्थापन कार्यक्षमतेसाठी ERP (Enterprise Resource Planning) प्रणाली लागू केली जाणार असून खर्चकपात संदर्भातील निकष निश्चित केले जाणार आहेत. प्रवासी सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्याची योजना श्वेतपत्रकात प्रवासी सुरक्षितता आणि सुविधा वाढवण्यासाठी ५,३०० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. NCMC (National Common Mobility Card) योजना सवलतीच्या प्रवाशांसाठी लागू केली जाणार आहे. डिजिटल तिकिट प्रणालीद्वारे ETIM आणि ORS प्रणालीचा वापर वाढवण्यात येणार आहे. प्रवासी व मालमत्तांच्या सुरक्षेसाठी CCTV प्रणाली बसवली जाणार आहे. अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. सध्या सवलत नसलेल्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी भाड्यात सवलत देण्याचा विचार आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी welfare schemes राबवण्याची योजना देखील आहे. कार्यक्षमता आणि सेवा वाढ MSRTC ची स्थापना १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर या एका बसमार्गावरून सुरू झाली होती. सुरुवातीच्या दशकांत steady growth पाहायला मिळाली. १९८१-८२ साली बसांची सरासरी संख्या १०,०२८ होती, जी २०११-१२ साली १८,२७५ झाली. मात्र २०२४-२५ पर्यंत ती घसरून १५,७६४ झाली आहे. कर्मचारी संख्या १९८१-८२ मध्ये ७९,४५८ होती, जी १९९१-९२ मध्ये १,१२,२०० इतकी झाली; मात्र अलीकडे ८६,३१७ इतकीच राहिली आहे. वार्षिक किलोमीटर ७९.९४ कोटीहून २०११-१२ मध्ये १९८.३८ कोटी झाली, मात्र २०२४-२५ मध्ये ती १८५.८० कोटी झाली. प्रवासी संख्येतही अशाच प्रकारे घसरण झाली आहे. बसस्थानकांची संख्या १९८१-८२ मध्ये ३९६ होती, जी आता २०२४-२५ मध्ये ५९८ झाली आहे. आर्थिक अडचणींची प्रमुख कारणे महामंडळाच्या आर्थिक अडचणींमागे प्रमुख कारण म्हणजे ताफ्यातील बसांची कमतरता आणि जुन्या बसमुळे होणारे वारंवार ब्रेकडाउन. तसेच अनेक तोट्यातील मार्गांवर सामाजिक बांधिलकीतून सेवा सुरू ठेवावी लागत आहे. भाड्याच्या संरचनेत वेळोवेळी योग्य ते बदल न झाल्यामुळे महसुलात वाढ झाली नाही. अवैध वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासी संख्या घटली आहे. एकूण तोटा आणि थकबाकी २०२३-२४ मध्ये MSRTC चा एकूण संचित तोटा १०,३२२.३२ कोटी इतका होता. त्याच वर्षी कर्मचारी वेतन ४,८६४.३४ कोटी, इंधन खर्च ३,६५६.७६ कोटी इतका होता. २०१८-१९ मध्ये वेतन ₹३,७८७.९२ कोटी व इंधन ३,०१३.६७ कोटी होता. दैनंदिन वाहन उपयोग दर ३४७.४४ किमी असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. इंधन कार्यक्षमता ४.४५ किमी प्रति लिटर आहे, जी सर्वात कमी आहे. मात्र उत्पन्न प्रति किमी ५५.०३ आहे, जे इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. मार्च २०२५ पर्यंत ३,५०० कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. यामध्ये PF थकबाकी १,२६२.७२ कोटी, ग्रॅच्युइटी ट्रस्ट १,११४.८९ कोटी, इंधन-सप्लायर बिल २१७.१९ कोटी, आणि प्रवासी कर थकबाकी ८२१.१३ कोटी समाविष्ट आहे. शासनाकडून मिळालेली मदत २००१ ते २०२४ दरम्यान शासनाकडून ६,३५३.८० कोटीची भांडवली मदत मिळाली. कोविड काळात आणि संपाच्या पार्श्वभूमीवर ४,७०८.७३ कोटी अनुदान दिले गेले. गेल्या चार वर्षांत ९,९२२.७८ कोटींचे अनुदान मिळाले आहे.

Maharashtra News: एसटी महामंडळ तोट्यात; आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर Read More »