DNA मराठी

ट्रेंडिंग

Nilesh Lanke

Nilesh Lanke: कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक; 23 जूनला आंदोलन

Nilesh Lanke : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कृषी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच शेतकरी हिताच्या विविध मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा २३ जून रोजी पारनेर तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खासदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी, सामाजिक व सर्वपक्षीय संघटनांनी दिला आहे. यासंदर्भात खासदार लंके यांनी गुरुवारी तहसीलदार गायत्री सैंदाने यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले. या निवेदनात कर्जमाफी योजनेतील विविध अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या योजनेत अनेक निर्बंध घालण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात सन २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील ५० हजार रुपयांच्या मर्यादेची अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेतील मर्यादा हटविणे, १२ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवरील अटी रद्द करणे, प्रोत्साहनपर अनुदानासाठीची दोन वर्षे नियमित कर्जफेडीची अट हटविणे, पीकविमा योजनेतील जाचक ट्रिगर अटी रद्द करणे आणि खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे पुनर्गठन करण्याच्या मागण्यांचाही समावेश आहे. याशिवाय पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांमध्ये कपात करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पारनेर तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी प्रश्नांवर सर्वपक्षीय संघटना एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास २३ जून रोजी पारनेर तालुक्यातील सर्व प्रमुख रस्ते बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पारनेर तालुक्यासह राज्यातील विविध भागांत मागण्या मान्य होईपर्यंत लोकशाही मार्गाने टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही खासदार नीलेश लंके यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा असून शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Nilesh Lanke: कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात खा. लंके आक्रमक; 23 जूनला आंदोलन Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe : माझं नाव चर्चेत आणूनच नका, दरवेळी पत्ता कट होतो : सुजय विखे

Sujay Vikhe: ‘राहुरी पोट निवडणूक आली, माझं नाव पुढं आलं. पुढे पत्ता कट झाला.. विधान परिषद निवडणूक आली.. पुन्हा माझं नाव आणि पत्ता कट… आता पुन्हा विधान परिषद आली, माझं नाव आलं, पत्ता कट.. यापुढं माझं नाव चर्चेत आणूच नका,’ असे वक्तव्य माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळासंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान करून संस्थावर कोणाची नियुक्ती करावी, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचेही सांगितले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डॉ. विखे यांचे जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्यावेळी नाव पुढे आले. मात्र, त्यांना संधी मिळालीच नाही. आता शिर्डीच्या साईबााबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डॉ. विखे पाटील यांचे नाव पुन्हा एकदा पुढे आले आहे. याच अनुषंगाने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, तुम्हीच माझे नाव पुढे आणता आणि पुढे पत्ता कट झाला म्हणता. त्यामुळे आता माझे नाव पुढे आणूच नका. संस्थानवरील नियुक्तीच्या प्रक्रियेत विखे पाटील कुटुंब कधीच नव्हते. तरीही शिर्डीकरांचा विखे पाटील यांच्यावर विश्वास आहे. विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. कोणीही आले तरी त्यांना शिर्डीच्या विकासासाठी काम करावेच लागेल. नाही केले तर शिर्डीचे लोक जाब विचारतील. माझ्या मते या संस्थानवर सुशिक्षित आणि समृद्ध माणसे यावीत. मोठमोठ्या कंपन्या चालविणारे, नावाजलेले, पद्मश्री, पदमभूषण असे लोक आले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा शिर्डीला होईल. अर्थात हे सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकत्र बसून यासंबंधी निर्णय घेतील, असेही डॉ. विखे म्हणाले.

Sujay Vikhe : माझं नाव चर्चेत आणूनच नका, दरवेळी पत्ता कट होतो : सुजय विखे Read More »

Rohit Pawar

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar: गेल्या काही दिवसांत विविध पदे आणि उमेदवारी वाटपांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कुटुंबातील आणि मर्जीतील व्यक्तींना संधी देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम झाला. येत्या पंधरा दिवसांत पक्षात फेरबदल केले जाणार असून ज्यांचे कोणा नेत्याशी नाते, घराणेशाहीशी संबंध नाही, अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत. रोहित पवार म्हणाले, पुढील दहा पंधरा दिवसात पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात येणार आहेत. ज्यांचे कोणाही नेत्याशी नाते नाही, ज्यांचा घराणेशाहीशी संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांना पक्षाची पदे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते, युवक आणि महिलांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षात बदल करण्याच्या घोषणा शक्यतो स्वतः शरद पवार करीत असतात. यावेळी पवार किंवा कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनाही पक्षात मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? Read More »

chhatrapati sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : वडापावच्या दुकानाला भीषण आग; 5 लाखांचे साहित्य खाक

Chhatrapati Sambhajinagar : शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी गजबजलेल्या जुबली पार्क परिसरात बुधवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. येथील एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानाला अचानक आग लागली. आगीदरम्यान दुकानातील गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र तसेच एन-९ अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील मौल्यवान साहित्य जळून खाक झाले असून सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती अशोक खांडेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा छत्रपती संभाजीनगर यांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar : वडापावच्या दुकानाला भीषण आग; 5 लाखांचे साहित्य खाक Read More »

abdul sattar

Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे अर्ज बाद

Abdul Sattar : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तब्बल 214 अर्ज दाखल झाल्याने अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुतीमधून सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट, तर काँग्रेसकडून खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय, आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार, पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट, दिनेशसिंह परदेशी, जगन्नाथ काळे, खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार अंबादास दानवे, देवयानी पाटील डोणगावकर, सुहास शिरसाठ, रामराव शेळके आणि अभिजित देशमुख यांच्यासह अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज बाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचे अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आले. तसेच आमदार अनुराधा चव्हाण यांचा एक अर्जही बाद झाला. मात्र त्यांनी अन्य जागेसाठी दाखल केलेला दुसरा अर्ज वैध ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. अर्जांमधील तांत्रिक त्रुटींमुळे हे अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दोन महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Abdul Sattar : जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे अर्ज बाद Read More »

census 2026

Census 2026 : जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीय

Census 2026 : भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या जनगणना मोहिमेत अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३० दिवसांसाठी नियोजित असलेले जनगणनेचे उद्दिष्ट केवळ २१ दिवसांत पूर्ण करून महानगरपालिकेने कार्यक्षमता, प्रभावी नियोजन आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या यशामागे प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अॅम्बेसेडर डॉ. अमोल बागुल, मास्टर ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक तसेच तांत्रिक पथक यांचे समन्वयपूर्ण नेतृत्व आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. या यशाबाबत आयुक्त डांगे म्हणाले, “नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे या मोहिमेच्या यशाचे प्रमुख कारण ठरले. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने स्वतःसाठी वेळेची उद्दिष्टे निश्चित करून शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. त्यामुळे जनगणना मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक गती मिळाली. मोहिमेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडविण्यात आल्या. तसेच दर चार दिवसांनी आढावा बैठका घेऊन पुढील टप्प्यांचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण मोहिमेत सातत्य, वेग आणि अचूकता कायम राखणे शक्य झाले.” अतिरिक्त आयुक्त मुतकेकर यांनी सांगितले की, जनजागृती आणि संवादावर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी विविध नावीन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रेरणादायी गीते, माहितीपर चित्रफिती, दैनंदिन ग्राफिक संदेश, आकाशवाणीवरील मुलाखती, जिंगल्स तसेच विविध समाजमाध्यमांद्वारे नागरिक, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे सातत्याने प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे मोहिमेला व्यापक लोकसहभाग लाभला. अचूक माहिती संकलन, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रभावी जनजागृती आणि संघभावनेच्या बळावर अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात मानाचे स्थान मिळविले आहे. ही कामगिरी भविष्यातील प्रशासकीय उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून जनगणना कार्यात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रगणक, पर्यवेक्षक आणि सहायक पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Census 2026 : जनगणनेत अहिल्यानगर महानगरपालिका राज्यात द्वितीय Read More »

Vikhe Patil

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर

Ashadhi Wari Palkhi : आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याला ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून विश्वगुरू संत निवृत्ती महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री संत निळोबाराय महाराज व श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी (नेवासा) यांच्याबरोबरच अन्य पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, औषधे पुरवणे तसेच जलरोधक मंडप उभारणीकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनास सादरही करण्यात आला होता. राज्यातील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पालख्यांना आणि वारकऱ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. “आषाढी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या अहिल्यानगरच्या पालख्यांचा मान महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.

Ashadhi Wari Palkhi : वारी निमित्त जिल्ह्याला 3 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर Read More »

navale bridge

Navale Bridge : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू 4 जण गंभीर जखमी…

Navale Bridge : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. सीमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास नवले पुलाच्या उतारावरून येत असताना सीमेंट ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकने पुढे जाणाऱ्या वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरून जात असलेल्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक बसली. गंभीर जखमी झालेल्या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. ट्रक चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण आणि ब्रेक निकामी होण्यामागील तांत्रिक बाबींचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नवले पुलावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Navale Bridge : नवले पुलाजवळ भीषण अपघात; डिलिव्हरी बॉयचा मृत्यू 4 जण गंभीर जखमी… Read More »

kishor masal

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’

Kishor Masal : बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटल आहे. व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं ? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे. तर माफीनाम्यावर बोलताना किशोर मासाळ म्हणाले की, एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिप वर तुम्ही कसं ठरवलं की तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही अस माध्यमांशी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले.

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’ Read More »

jcb

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त

Jalgaon News : जळगावमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. एमडी ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित ड्रग माफिया रईस हसन देशमुख याच्या अवैध घरावर आणि दुकानावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. जळगावच्या इतिहासात अमली पदार्थ तस्कराविरोधात झालेली ही पहिलीच बुलडोझर कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचे एमडी अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात आरोपींकडून कार, दुचाकी आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आले होते. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेला रईस हसन देशमुख सध्या पोलीस कोठडीत असून, तपासादरम्यान त्याने एमआयडीसी परिसरात नियमांचे उल्लंघन करून अवैध दुकान आणि घर उभारल्याचे निष्पन्न झाले.यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि जिल्हा पोलीस दलाने संयुक्त कारवाई करत आरोपीचे अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम हाती घेतली. कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने आरोपीचे दुकान आणि घर जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर प्रशासकीय आणि आर्थिक कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित फरार आरोपींचा शोधही पोलीस घेत असल्याची माहिती पंकज गोसावी, उपायुक्त महानगरपालिका, जळगाव यांनी दिली.

Jalgaon News : जळगावात ड्रग माफियावर बुलडोझर कारवाई; मुख्य आरोपीचे अवैध घर, दुकान जमीनदोस्त Read More »