DNA मराठी

ऑटोमोबाईल

maharashtra budget session

Maharashtra Budget Session : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून; ‘या’ विषयावर होणार चर्चा

Maharashtra Budget Session : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे  कामकाज सोमवार दि.२३  फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दि. २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक ६ मार्च २०२६  रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड.आशिष शेलार, आमदार सर्वश्री अनिल परब, प्रसाद लाड, भास्कर जाधव, जयंत पाटील, सुनील प्रभु, भाई जगताप, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अधिवेशन काळात शनिवार दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे.सोमवार दि. २ मार्च २०२६ रोजी होळी आणि ३ मार्च २०२६ रोजी धूलिवंदन असल्याने  कामकाज होणार नाही.  दिनांक १,७,८,१४,१५,२१,२२ मार्च रोजी शासकीय सुट्टी आणि दिनांक १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तर दि.२० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही. या अधिवेशनात यावर होणार चर्चा संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६  हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.या अधिवेशनात यावर चर्चा करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा  होणार आहे. मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होईल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा  निरोप समारंभ होईल.

Maharashtra Budget Session : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून; ‘या’ विषयावर होणार चर्चा Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: आनंदाची बातमी! 70 हजार पदांची लवकरच नोकरभरती होणार; CM फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार  निर्णय घेण्याचे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी  इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis: आनंदाची बातमी! 70 हजार पदांची लवकरच नोकरभरती होणार; CM फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

mpsc exam

SSC Exam : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत, शांततेत व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडाव्यात, यासाठी शिर्डी उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. राहाता व कोपरगाव तालुक्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये (पूर्वीचे कलम १४४) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहेत. या संपूर्ण कालावधीत परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात परीक्षार्थी, परीक्षेच्या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी व उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी/आयएसडी बूथ, तसेच ध्वनीक्षेपक व तत्सम उपकरणे परीक्षा सुरु असलेल्या वेळेत पूर्णपणे बंद ठेवावी लागतील. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाईल फोन, पेजर, संगणक, लॅपटॉप इत्यादी साहित्याचा वापर परीक्षा सुरू असलेल्या वेळेत करता येणार नाही. (मात्र, हा नियम परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वाहनांना लागू नसेल.) या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

SSC Exam : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक

Chandrashekhar Bawankule: राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२ उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (७/१२) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच शिवाय, प्रत्येक भूखंडाला आता ‘भू-आधार’ क्रमांक (ULPIN) मिळणार आहे. 2 कोटींहून अधिक पोटहिश्शांचा होणार ‘डिजिटल’ कायापालट राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या सर्व पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तरी नकाशे आणि ७/१२ उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून आता ‘पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प’ सुरू करण्यात येत आहे. काय आहे ‘भू-आधार’ ? केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला आता Unique Land Parcel Identification Number (ULPIN) म्हणजेच ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच जमिनीची सर्व माहिती या एका क्रमांकावर उपलब्ध असेल. यामुळे पीक विमा, बँकांकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना होणारे थेट फायदे वादातून सुटका: जमिनीचे क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद कमी होतील. अचूक नकाशे: ७/१२ उताऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल. डिजिटल डेटाबेस: पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असेल. खरेदी-विक्री सुलभ: जमिनीच्या व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल. अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना या प्रकल्पाच्या सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समित्या या कामाचा आठवड्याला आढावा घेतील. यामध्ये खासगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. नकाशे आणि ७/१२ यांचा मेळ बसल्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींचे अर्थकारण अधिक मजबूत होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक Read More »

MP Sujay Vikhe

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला

Sujay Vikhe: राहुरीत नगर मनमाड राज्य महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आयोजित बैठकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली. “आम्ही कधीही पदाचा अहंकार बाळगलेला नाही. जनतेसाठी काम करताना सरळ आणि प्रामाणिक भूमिका घेतो,” असे सांगत त्यांनी प्रशासन, ठेकेदार आणि नागरिकांनाही जबाबदारीची जाणीव करून दिली. काम करताना गोड बोलण्यापेक्षा थेट आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. नगर मनमाड महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून 20 फेब्रुवारीपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी आणि प्रवाशांनी संयम व सहकार्य ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. महामार्गालगतच्या बंदिस्त साईड गटारापासून चार मीटरपर्यंत असलेली अतिक्रमणे संबंधित व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून हटवावीत, अन्यथा प्रशासनामार्फत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. व्यापाऱ्यांच्या तक्रारींवर थेट चर्चा सध्या राहुरी शहर हद्दीत साईड गटाराचे काम सुरू असून गटारी रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आल्या होत्या. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्ञानेश्वर चित्र मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या. “थोडा त्रास सहन करा, प्रश्न कायमचा सुटेल” काम पूर्ण होईपर्यंत काही काळ गैरसोय होईल, मात्र त्यानंतर नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी विकासकामांना अडथळे निर्माण होऊ नयेत, यावर भर दिला. समस्या ऐकून थेट आदेश बैठकीत उपस्थित नागरिकांनी पाणी निचरा, रस्त्याची उंची, दुकानांपर्यंत पोहोच आणि वाहतुकीसंबंधी विविध प्रश्न उपस्थित केले. या प्रत्येक समस्येची गंभीर दखल घेत डॉ. सुजय विखे यांनी ठेकेदार व प्रशासनाला जागेवरच स्पष्ट आदेश दिले. गैरसमज दूर करत कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. समस्या सोडवणे हाच उद्देश अनेक तांत्रिक अडचणी असूनही हे काम सुरू आहे. सध्या आंदोलन किंवा वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. श्रेय कुणीही घ्यावे, मात्र काम वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. पुढील एका महिन्यात शहरातील काम पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “मी पदाचा नव्हे, कामाचा माणूस आहे” “मी माजी खासदार असलो तरी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नका. रखडलेली व वाढीव रस्त्यांची कामे वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्याची जबाबदारी मी घेतो. ठेकेदाराला अडथळे आले तर काम थांबेल, आणि त्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागेल. भविष्यातील पिढीने आपल्याला दोष देऊ नये, यासाठी हे काम पूर्ण होऊ द्या,” असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला. अजित पवार यांच्या निर्णयक्षम नेतृत्वाची आठवण नगर मनमाड महामार्गावरील दीर्घकाळापासून प्रलंबित व नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या समस्यांवर आयोजित बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका घेतली. कोणतीही तडजोड न करता त्यांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे अनेकांना स्वर्गीय अजित पवार यांच्या निर्णयक्षम बैठकीची आठवण झाली.

Sujay Vikhe: गोड बोलणाऱ्यांना घरात बसवा अन्… अजित पवारांच्या शैलीत सुजय विखेंचा थेट हल्ला Read More »

Police

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Ahilyanagar News : प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने वाहनांच्या विंडस्क्रीन व खिडक्यांच्या काचांवर बेकायदेशीरपणे लावण्यात येणाऱ्या ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात जिल्ह्यात विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबवली. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण २ हजार २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात दोषी आढळलेल्या ४५८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली. या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय व श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत कार्यरत सर्व वायुवेग पथके, तसेच जिल्ह्यातील १४ तालुका पथकांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. या पथकांनी एकूण २०२१ वाहनांची कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्या ४५८ वाहनांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळल्या, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आकारण्यात आलेल्या ६ लाख ४६ हजार रुपये दंडापैकी ३७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स काढून टाकण्यात आल्या आहेत. या विशेष मोहिमेत ब्लॅक फिल्म व्यतिरिक्त इतर बाबींचीही पडताळणी करण्यात आली. यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे, वाहन चालवण्याचा परवाना नसणे, वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी व वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. “जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांची समोरील (दर्शनी) काच व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये. कायद्यातील अटी व शर्तींचे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सहकार्य करावे,” असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी केले आहे.

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात धडक मोहीम ; 458 वाहनांवर दंडात्मक कारवाई Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश

Nilesh Lanke: केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी, प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली असून, हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर असून, सुमारे १९ हजार १४२ कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंतचा एक महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. परिणामी राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे. महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार असल्याचे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम होणार असून, अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येणार आहे. या निर्णयाचे स्वागत करताना खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी; निलेश लंकेंच्या प्रयत्नांना यश Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

shirdi news

Shirdi News :  शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर मोठी कारवाई

Shirdi News : साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातूनच पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खासगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटांवर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे सशर्त आदेश शिर्डी विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी निर्गमित केले आहेत. शिर्डीत दररोज देश-विदेशातून लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिर परिसर व शिर्डी शहरात अनेक ठिकाणी खासगी व्यक्तींकडून सार्वजनिक रस्त्यावर भाविकांची वाहने बेकायदेशीरपणे अडवली जातात. भाविकांना खासगी पार्किंगच्या ठिकाणी वाहने घेण्याचा आग्रह धरला जातो. तसेच विशिष्ट दुकानांतून अव्वाच्या सव्वा दरात पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जाते. यातून भाविकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अनेकदा भाविकांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करण्याचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शिर्डी गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे व प्रवेश मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने थांबवून त्यांची दिशाभूल करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही गावातून शिर्डी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनांनी विशिष्ट दुकान अथवा आस्थापनेतूनच खरेदी करावी किंवा निवास करावा, असा आग्रह आता धरता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली मध्यस्थीचे व्यवहार करणाऱ्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाने प्रभावित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपली बाजू मांडता येईल, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Shirdi News :  शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर मोठी कारवाई Read More »

silver rate

Silver Rate Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का; चांदीचा भाव 85 हजार रुपयांनी घसरला, जाणून घ्या आजचा भाव

Silver Rate Today : गुरुवारी, सोने आणि चांदीच्या किमतीत झालेल्या ऐतिहासिक वाढीमुळे सामान्य लोकांमध्ये धाकधूक वाढली होती.  परंतु एकाच दिवसात संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. गुरुवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीने प्रति किलोग्रॅम ₹4,20,048 या नवीन उच्चांकावर पोहोचला. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर अवघ्या एका दिवसात, नफा-बुकिंगने सराफा बाजाराला हादरवून टाकले. मार्चमध्ये संपणारे चांदीचे वायदे जवळजवळ 17 टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्रॅम 3,32,002 वर आले. ही घसरण केवळ 24 तासांत अंदाजे 21 टक्के (प्रति किलोग्रॅम ₹88,046) घसरण दर्शवते. सोन्याचा भाव MCX वर एप्रिलमध्ये संपणारे सोन्याचे वायदे जवळजवळ 9 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,67,406 या नीचांकी पातळीवर पोहोचले. फक्त एक दिवस आधी, सोन्याचे वायदे प्रति 10 ग्रॅम ₹1,93,096 या नवीन उच्चांकावर पोहोचले होते. याचा अर्थ असा की सोन्याच्या वायदा किमती फक्त 24 तासांत 13 टक्क्यांनी (₹26,960 प्रति 10 ग्रॅम) घसरल्या. दिल्ली सराफा बाजाराची परिस्थिती शुक्रवारी, दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 14,000 रुपयांनी आणि चांदीच्या किमती प्रति किलोग्रॅम 20,000 रुपयांनी घसरल्या. अहवालांनुसार, 99.9 टक्के शुद्धता असलेले सोने प्रति 10 ग्रॅम 14,000 रुपयांनी किंवा 7.65 टक्क्यांनी घसरून 169,000 रुपयांनी (सर्व करांसह) झाले. गुरुवारी, सोन्याच्या किमती 12,000 रुपयांनी वाढून 183,000 रुपयांनी प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या. चांदीच्या किमती 20,000 रुपयांनी किंवा जवळजवळ पाच टक्क्यांनी घसरून 384,500 रुपयांनी प्रति किलोग्रॅमवर पोहोचल्या (सर्व करांसह). मागील व्यापार सत्रात चांदीच्या किमती 19,500 रुपयांनी वाढून 4,04,500 रुपयांनी प्रति किलोग्रॅमवर पोहोचल्या. तज्ञ काय म्हणतात एचडीएफसी सिक्युरिटीजमधील वरिष्ठ विश्लेषक – कमोडिटीज सौमिल गांधी म्हणाले की, शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली कारण अलिकडच्या विक्रमी तेजीनंतर गुंतवणूकदारांनी वेगाने नफा बुक करण्यास सुरुवात केली. ही घसरण प्रामुख्याने मोठ्या संस्थात्मक व्यापाऱ्यांनी दीर्घ मुदतीच्या पोझिशन्सची जोरदार विक्री केल्यामुळे झाली, ज्यांनी अनेक सत्रांमध्ये जोरदार वाढ झाल्यानंतर नफा बुक करण्याचा प्रयत्न केला.

Silver Rate Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का; चांदीचा भाव 85 हजार रुपयांनी घसरला, जाणून घ्या आजचा भाव Read More »