Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यकरून चर्चेत असणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर शहरात भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नितेश राणे यांच्या विरोधात शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितेश राणे यांच्या नेतृत्वात 1 सप्टेंबर रोजी शहरात महंत रामगिरी महाराज यांचे समर्थन करण्यासाठी रॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना राणे यांनी आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात जर कोणी चुकीचं बोललं तर त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं होतं.
या प्रकरणात मुस्लिम बांधवांनी रविवारी रात्री पोलिसांना निवेदन देऊन नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय म्हणाले होते नितेश राणे
रामगिरी महाराज काही चुकीचं बोलले नाही, त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर मस्जिदमध्ये घुसून मारू, तुमची जीभ जाग्यावर ठेवणार नाही, आम्ही 90% आहोत तुम्ही दहा टक्के आत तुमची बांगलादेशासारखी अवस्था करू, तुम्ही जर जास्त वळवळ केली तर तेवढ्या संख्येने बाहेर पडून तुम्हाला किड्या मकोड्यासारखे तुम्ही मराल , आपण दोन किलोमीटर चालत आलो, तुम्ही बाजूला बघितलं का कसे हातभर फाटून आत बसले होते, या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण काय
महंत रामगिरी महाराज यांनी गेल्या काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाचे पैगंबरबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले होते, राज्यामध्ये ठिकठिकाणी रामगिरी महाराजांना विरोध आंदोलने झाले होती.
तर 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदू समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला, शहर परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला असून संतप्त मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
या निवेदनाप्रसंगी शहरातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.