DNA मराठी

राम शिंदेंच्या पराभवामागे षडयंत्र! – महसूल मंत्री बावनकुळेंचा घणाघात”पण कुणी पाडलं?” – राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अहिल्यानगर – “राम शिंदे हे कर्तबगार आणि जनतेशी जोडलेले नेते आहेत. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक षडयंत्र रचून पाडण्यात आलं,” असा घणाघात करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक नवा राजकीय भडका उडवला आहे. मात्र, त्यांनी कोणावरही थेट नाव घेऊन आरोप न करता, ‘पण कुणी पाडलं?’ या सवालाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.

शेवगावमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “राम शिंदेंनी मैदानात आणि राजकारणात नेहमी झुंज दिली आहे. त्यांच्यावर अन्याय झाला आहे. हा पराभव नैसर्गिक नव्हता, तर हे एक संगनमताचे षडयंत्र होतं.

राजकीय सूत्रांच्या मते, बावनकुळे यांचा हा इशारा पक्षांतर्गत गटबाजीकडे असल्याची शक्यता आहे. मात्र, बावनकुळे यांनी नामोल्लेख टाळल्याने चर्चा आणि तर्कांना अधिक उधाण आलं आहे.

स्थानिक कार्यकर्ते आणि राम शिंदे समर्थकांनी देखील या वक्तव्याला दुजोरा देत, “खरं कुणी पाडलं, हे आता लोकांनी समजून घ्यायला हवं,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, या विधानामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात पुन्हा एकदा खदखद वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पुढील काही दिवसांत या आरोपाचा प्रतिध्वनी दिल्लीपासून जिल्हापर्यंत ऐकू येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय भूकंप होतोय का? की केवळ इशारा? या आरोपाच्या पडद्यामागे नेमकं काय? – येणाऱ्या काळात स्पष्ट होईल!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *