India vs Australia 2025 : भारताविरुद्ध 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या व्हाईट बॉल मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे.
एकदिवसीय संघात प्रमुख पुनरागमन
मिशेल स्टार्क, मॅथ्यू शॉर्ट आणि मिशेल ओवेन एकदिवसीय संघात पुनरागमन केले. शॉर्टला यापूर्वी साईड स्ट्रेनमुळे वगळण्यात आले होते, तर ओवेन दक्षिण आफ्रिकेतील टी20 मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर संघात परतला आहे. संघात डावखुरा फलंदाज मॅथ्यू रेनशॉ देखील आहे, ज्याला देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर दोन वर्षांत प्रथमच एकदिवसीय संघात परत बोलावण्यात आले आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरी शेफील्ड शिल्डच्या दुसऱ्या फेरीत सहभागी झाल्यामुळे पर्थमधील पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. त्याच्या जागी जोश इंग्लिस विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळणार.
तर दुसरीकडे जोश इंग्लिस आणि नॅथन एलिस टी20 संघात परतले आहेत. इंग्लिस पायाच्या दुखापतीतून बरा झाला आहे, तर एलिस त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर संघात परतला आहे. न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान झालेल्या मनगटाच्या फ्रॅक्चरमुळे ग्लेन मॅक्सवेल अनुपलब्ध आहे.
ऑस्ट्रेलियाचे निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले की, संघ निवडीत टी20 विश्वचषक तयारी आणि स्थानिक रेड-बॉल हंगामाचे संतुलन राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. बेली म्हणाले, आम्ही पहिल्या दोन एकदिवसीय आणि टी20 साठी संघ जाहीर केला आहे. शेफील्ड शिल्ड क्रिकेटद्वारे उन्हाळ्याची तयारी करताना मालिकेच्या शेवटी काही खेळाडूंचे व्यवस्थापन आवश्यक असेल.
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि टी-20 संघ
एकदिवसीय संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, कूपर कॉनोली, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा.
टी-20 संघ (पहिले दोन सामने): मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.