Navnath Waghmare : जालन्यातील निलम नगर परिसरात रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागल्याची घटना घडली. ही आग जाळपोळीच्या उद्देशाने लावण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी वाघमारे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कदीम जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
रविवारी रात्री साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळील निलम नगर येथील नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच वाघमारे यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गाडीजवळ एक संशयास्पद व्यक्ती आल्याचे दिसून आले, अशी माहिती त्यांनी दिली.
या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी थेट जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर आरोप केले. “शनिवारी संध्याकाळपासून माझी गाडी घरासमोर झाकून ठेवलेली होती. मी दुसऱ्या गाडीने बाहेरगावी दौऱ्यावर होतो. रात्री जेवणानंतर मी गाडीपासून काही अंतरावर फिरायला गेलो असताना, दहा-पंधरा मिनिटांतच गाडीला आग लागल्याचा आरडाओरडा झाला,” असे वाघमारे यांनी सांगितले.
या घटनेसाठी जरांगे-पाटील यांच्या समर्थकांना पूर्णतः जबाबदार धरत वाघमारे यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मी जरांगेसारखा भिकारचोट नाही. गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही. आम्ही ठरवले आणि जरांगे यांच्या गाड्या आणि घरे जाळले तर चालेल का? परंतू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे निष्ठावान आहोत आणि असे कृत्य आम्ही करणार नाही.”
याचवेळी वाघमारे यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली.
सध्या पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे जालन्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.