Aslam Shaikh: माझे नाव अजून कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडलं आहे का? माझे नाव दोन मतदार याद्यांमध्ये असणं, ही निवडणूक आयोगाची चूक आहे. याची सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाचीच आहे, अशी भूमिका काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी आज मांडली.
जगभरात तंत्रज्ञानानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झालेली आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने दुबार मतदार शोधणे सहज शक्य आहे, मात्र असे असताना देखील मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहेत.
आता तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे व मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार असल्याचे मान्य केले आहे. आमदार आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन याची कबुलीच दिली आहे.
मालाड विधानसभेत 17 हजार मुस्लिम दुबार मतदार असल्याच्या आशिष शेलार यांच्या आरोपाला उत्तर देताना शेख म्हणाले, आशिष शेलार यांच्या भावाचा पराभव झाल्याने त्यांचा जळफळाट होत आहे. जर मालाड पश्चिम मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार असतील तर ते शोधुन काढणं, ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.
निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीचे नते वंदे मातरम् गीत गायनाचा कार्यक्रम माझ्या कार्यालयासमोर आयोजित करित आहेत. मी भाजपाच्या नेत्यांना विनंती करतो, रस्त्यावर कार्यक्रम घेण्यापेक्षा माझ्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करावा, आम्ही त्यांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देऊ.
निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची की स्वतंत्रपणे लढवायची याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. पण कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्र निवडणूक लढण्याची आहे. मुंबई महानगरपालिकेवर कॉंग्रेसचाच महापौर बसेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.






