Ajit Pawar On Sangram Jagtap: आम्ही भाजपसोबत असलो तरही आमचा पक्ष आंबेडकर, शाहू, फुले यांच्या विचारधाराचा असून समाजातील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार असं आपल्या प्रत्येक भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणत असतात. मात्र दुसरीकडे त्यांच्या पक्षातील नगर शहराचे आमदार संग्राम जगताप गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अजित पवार यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.
राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एका विशिष्ट धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्ध मिळवण्याचे काम काही नेतेमंडळी करत आहे. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्यासह समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी काहींना काही वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहत असतात. तर यामध्ये नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा देखील समावेश होत असून एका विशिष्ट धर्माला लक्ष करून जगताप हिंदुत्ववादी राजकणार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याच प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आमदार संग्राम जगताप यांचे गैरसमज दूर करणार असून आमचा पक्ष सर्व धर्मसमभाव प्रमाणे काम करत असून पुढे देखील याच पद्धतीने काम करणार असल्याचे स्पष्ट मत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना मांडले. त्यामुळे आता येणाऱ्या काळात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.