Asia Cup 2025 : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2025 पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत आशिया कप 2025 मध्ये दिसणार नाही. तसेच तो ऑक्टोबर महिन्यात वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत देखील खेळताना दिसणार नाही. याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे.
नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी आशिया कपचा 17 वा हंगाम 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळला जाईल. त्यानंतर काही दिवसांनीच भारताला वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची घरच्या कसोटी मालिका खेळायची आहे, जी 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाईल. पंतच्या अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापनाला नवीन रणनीती बनवावी लागेल.
ओल्ड ट्रॅफर्डमध्ये दुखापत
मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पंतला हा धक्का बसला, जेव्हा क्रिस वोक्सचा यॉर्कर त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला लागला. त्यावेळी पंत फलंदाजी करत होता आणि दुखापत इतकी गंभीर होती की त्याला ताबडतोब मैदानाबाहेर नेण्यात आले. स्कॅनमध्ये पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आणि डॉक्टरांनी किमान सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर
दुखापतीमुळे पंत अंतिम सामन्यात म्हणजेच ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यात भारताने इंग्लंडला रोमहर्षक पद्धतीने सहा धावांनी पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवट 2- 2असा केला. वृत्तानुसार, पंतची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही.
भारताची आशिया कप मोहीम
भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी युएईविरुद्ध आशिया कप मोहिमेची सुरुवात करेल. संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळण्याची शक्यता आहे. भारताला पाकिस्तान, यूएई आणि ओमानसह ग्रुप ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल, जेणेकरून आगामी टी-20 विश्वचषकाची तयारी करता येईल.