Ahmednagar News: खा.सुजय विखे पाटील यांनी आज राळेगणसिद्धी इथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा.सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
नामदार राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून आणि खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वत्र साखर-डाळ, शिरा गावोगावी नागरिकांना मोफत दिला जात आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
त्या अनुषंगाने आपण नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना मोफत साखर-डाळ शिरा वाटपाचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती खा.विखे यांनी अण्णांना दिली.
किट मध्ये साखर, डाळ, चालू वर्षाचे कॅलेंडर आदी गोष्टी आहेत. अण्णांना सदर किट यावेळी प्रदान करण्यात आले. आण्णा मी अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा यासाठी साखर-डाळ शिरा भेट देत आहे, आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. अण्णांनीही यावेळी खा.विखे यांच्या हस्ते दिलेली साखर भेट हसत स्वीकारली. तसेच किटमध्ये काय-काय वस्तू आहेत त्याची उत्सुकतेने पाहणी केली.
या अनौपचारिक भेटीत अण्णा हजारे यांनी विखे परिवारातील पद्मश्री विठ्ठलराव विखे, पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी अनेक विधायक कामे जनतेसाठी केली असल्याचे अण्णांनी यावेळी नमूद केले.
तसेच खा.सुजय विखे यांनी सुरू केलेल्या साखर-डाळ शिदा वाटप उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी काशिनाथ दाते सर, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.