Ahmednagar News: Dysp संदिप मिटके यांच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा टाकून तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त बातमी धारामार्फत Dysp संदीप मिटके यांना माहिती मिळाली की, कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेज मध्ये मनोज गिरमे हा इसम चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे.
या माहितीवरून संयुक्त कारवाई करण्याकरिता संदीप मिटके यांनी कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळवून माहिती दिली.
त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अमलदार पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 19 घरगुती गॅस टाक्या तसेच 2 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.
तसेच मनोज चंद्रकांत गिरमे (वय 43 रा. खडकी रोड तालुका कोपरगाव) अल्ताफ बाबू शेख ( वय 48 रा. मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक) या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने , गॅस टाक्या, मशीन असा एकूण 4,66,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3,7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.