Ahmednagar News: अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांवर गोळीबार, प्राणघातक हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर शहरामध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आज पर्यंत पुणे,मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार, प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोन नगर सारख्या शहरापर्यंत पोहचल्याचे दिसुन येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन नगर सारख्या शहरामध्ये सर्व सामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठया महानगरांमध्ये घडल्याचे माहित असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने घडू लागल्या आहे.
हा फार मोठा चिंतेचा विषय असुन नगरमध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे गंभीर गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे सापडून देखील गुन्हेगार दोन चार दिवसात जामीनावर बाहेर असतात हे पोलीस प्रशासनाचे अपयश असुन गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावुन त्यांच्याविरुध्द योग्य पध्दतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत.
गुन्हेगारांना कायदयाचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली.
नगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे, युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, जॉय लोखंडे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते.