Ahmednagar News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एम.आय.डी.सी. परिसरामध्ये बहीणीच्या घरी घरफोडी करणारा आरोपी तब्बल 16,18,900 रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद केला आहे.
फिर्यादी सुजय सुनिल गांधी 30 डिसेंबर रोजी लग्न समारंभाचे कार्यक्रमाकरिता गेले असता रात्री 11 च्या सुमारास परत घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बंद घराचे दरवाजाचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन 2,50,000 रुपये रोख रक्कम व 4,80,000 रुपये किमतीचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 3000 रुपये किमतीची लोखंडी तिजोरी असा एकुण 7,33,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला.
सदर घटनेबाबत एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबाबत तपास करत असताना पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, फिर्यादीचा मेव्हणा सुरज प्रकाश लोढा याने मुथुट फायनान्स कंपनीमध्ये काही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या आहे.
प्राप्त माहितीवरून पोलीस पथक सुरज लोढा याची माहिती घेत असतांना त्याच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने पोलीस पथकाने 03 जानेवारी रोजी सुरज प्रकाश लोढा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत बारकाईने विचारपुस केली. या तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपीकडून त्याने चोरी केलेले 13,26,400 रुपये किमतीचे 221 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2,04,500 रुपये रोख रक्कम, तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेले 16,000 रुपये किमतीचे दोन मोबाईल, 70,000 रुपये किमतीची मोटारसायकल, 2000 रुपये किमतीचे तिजोरी कापण्यासाठी वापरलेले ग्राइंडर असा एकुण 16,18,900 रुपये किमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त केला आहे.
तसेच त्याने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 04 सोन्याच्या बांगड्या मुथुट फायनान्स कंपनीमध्ये गहाण ठेवले असल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासकामी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हे करीत आहेत.