Dnamarathi.com

 Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी एक भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार कल्याण-अहमदनगर महामार्गावर एसटी बस, ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. रात्री अडीचच्या सुमारास एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरसह तीन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे-मेहकर एसटी बस आणि इको कार यांच्यात धडक झाली. रात्री अडीच वाजता धवलपुरी फाट्याजवळ हा अपघात झाला, त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली. मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. 

दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ जाम झाला होता.

निलेश रावसाहेब भोर, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्मण पारधी, प्रकाश रावसाहेब थोरात, सचिन कांतीलाल मंडलीचा, अशोक चीमा केदार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात सुयोग अडसूळ नावाचा तरुण जखमी झाला आहे. अपघातातील उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगरमधील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *