Ahilyanagar Politics : महानगरपालिकेच्या 2025 च्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे राजकारणाच्या आरशात पाहण्याचा योगच जणू. दिवसभर शहरातील प्रभागांमधून फिरताना परिचित चेहरेच अधिक दिसत होते. ओळखीची माणसे, ओळखीचे चेहरे, काहींची पक्षनिष्ठाही माहीत होती. मात्र, संध्याकाळपर्यंत एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कोण कुठल्या पक्षाचा आहे, हेच समजत नव्हते.
चहाच्या टपरीवर बसलेला एकजण आत्मविश्वासाने सांगत होता, मी अमुक पक्षाचा आहे. तेवढ्यात त्याला फोन आला, तो उठून गेला. चहा संपवून आम्ही निवडणूक कार्यालयाकडे येताना पुन्हा तोच भेटला आणि सहजपणे म्हणाला, “मी दुसऱ्याच पक्षातून फॉर्म भरला आहे.” ही एखादी अपवादात्मक घटना नव्हती. मागील पाच-सहा दिवसांत अशा अनेक कथा ऐकायला मिळाल्या. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी—महायुती असो वा महाविकास आघाडी—सर्वच ठिकाणी चेहरे तेच, फक्त झेंडे बदललेले.
या पक्षांतरांच्या खेळात एक वाक्य मात्र सर्वत्र समानपणे ऐकू येत होते… “जनतेच्या कल्याणासाठी, प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी मी पक्ष बदलत आहे….
विरोधक असो वा सत्ताधारी, मोठा नेता असो वा स्थानिक इच्छुक हे वाक्य इतक्या गोडपणे, इतक्या सहजपणे उच्चारले जात होते की तेच जणू निवडणूक घोषवाक्य बनले होते. मात्र या घोषणांच्या आड एक कटू सत्य दडलेले होते….. जनतेच्या प्रश्नांचा उल्लेख कुठेच नव्हता.
रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, शिक्षण—अहिल्यानगरच्या नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांवर एकही ठोस चर्चा ऐकू आली नाही. सत्तेत असलेले अचानक विरोधक झाले, विरोधक सत्तेच्या जवळ गेले. निवडून आल्यावर आपण कोणत्या पक्षात असू, हे सांगण्याचीही तयारी अनेकांची नव्हती. आजचा विरोध उद्याचा सत्ताधारी होऊ शकतो, हीच जणू राजकीय हमी बनली आहे.
या सगळ्या धावपळीत एक गोष्ट ठळकपणे दिसली निवडणूक म्हणजे सार्वजनिक सेवेचा नव्हे, तर वैयक्तिक आणि कौटुंबिक व्यवस्थापनाचा प्रकल्प बनला आहे. कधी स्वतःसाठी, कधी पत्नीकरिता, कधी मुला-मुलीसाठी, कधी सुनेसाठी, तर कधी नातवासाठी जागा सुरक्षित करण्याची धडपड सुरू आहे. राजकारणाचा वारसा जपताना शहराचा वारसा मात्र दुर्लक्षित राहतो आहे.
लोकशाहीत निवडणूक ही जनतेसाठी असते, हे तत्वज्ञान कागदावरच उरले आहे का, असा प्रश्न पडतो. ज्यांच्या नावाने उमेदवारी मागितली जाते, ती जनता या सगळ्या प्रक्रियेत अदृश्य आहे. राजकीय गणिते जुळवताना सामाजिक वास्तव विसरले गेले आहे. अहिल्यानगरच्या या निवडणुकीत पक्षांतरांचा गोंधळ जितका वाढतो आहे, तितकीच जनतेची विश्वासार्हता कमी होत आहे.
शेवटी प्रश्न एवढाच उरतो. या निवडणुकीत जिंकणार कोण? पक्ष, उमेदवार की राजकीय घराणी? आणि हरलेली कोण? तर ती जनता, जिने पुन्हा एकदा विकासाच्या नावावर आश्वासनांची पिशवी खांद्यावर घेतली आहे. लोकसत्तेच्या परंपरेतून पाहिले तर ही निवडणूक केवळ सत्तेची नाही, तर लोकशाहीच्या आत्म्याची कसोटी आहे.






