DNA मराठी

Ahilyanagar News: Phone Pay चा गैरवापर अन् नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा

Ahilyanagar News: पाथर्डी येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली असून, चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोन-पे अ‍ॅपचा गैरवापर करुन नायब तहसीलदाराला तीन लाखाला गंडा घातला आहे. या घटनेत आरोपीने तब्बल २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची रक्कम विविध व्यक्तींच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी नायब तहसीलदार आप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नायब तहसीलदार आप्पासाहेब शिंदे हे पाथर्डी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ते पाथर्डी येथील आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरविल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही.

या मोबाईलमध्ये दोन सिमकार्ड होते. त्यापैकी एका क्रमांकाशी जोडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शेवगाव शाखेच्या खात्याशी संबंधित फोन-पे अ‍ॅप सक्रिय होते.५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने फोन-पे अ‍ॅपचा वापर करून विविध व्यक्ती व व्यावसायिकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे समोर आले आहे.

यामध्ये राजेंद्र दत्तात्रय पिंगळे, अनिल कुमार, इक्विटी कॅपिटल, आई एकविरा मोबाईल शॉपी, ऑल इज वेल, प्रमोदिनी हरीष गावंड, बाळासाहेब सोलास व बिकास बेहेरा आदींच्या खात्यांवर विविध टप्प्यांत मोठ्या रकमा वर्ग करण्यात आल्या. एकूण २ लाख ९९ हजार ४८० रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यालाच आर्थिक फटका बसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरीनंतर लगेचच डिजिटल व्यवहारांचा गैरवापर झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *