DNA मराठी

Ahilyanagar Crime: पाथर्डीत पूर्वीच्या वैमनस्यातून हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

Ahilyanagar Crime: पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीत दिलीप अश्रुबा आव्हाड (वय 35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून सुरू झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जांभळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद क्षणातच चांगल्या मारामारीत परिवर्तित झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तेजस सोमनाथ आव्हाड, विठठल भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर आश्रुबा आव्हाड यांसह एकूण पाच जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

2023 साली दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी एका व्यक्तीने गाव सोडले होते. शनिवारी तो पुन्हा गावात आल्यानंतर परिस्थिती ताणली गेली. रविवारी सकाळी दोन्ही गटातील पंधरा ते वीस जणांमध्ये तुफान बाचाबाची झाली आणि पुढे हाणामारीला सुरुवात झाली.भांडणात धारदार शस्त्रे, काठ्या, तसेच दगडांचा वापर झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक निरज राजगुरू, पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर व संदीप ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *