Mumbai Fire: एकीकडे मुंबईमध्ये धो धो पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे बोरिवली परिसरात गुरुवारी एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई उपनगरातील बोरिवली भागातील एका उंच इमारतीला गुरुवारी 12.30 च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने काही मिनिटांत आग आटोक्यात आणली.
22 मजली कनाकिया समर्पण टॉवरमध्ये ही आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील कनकिया समर्पण टॉवरला 12.37 वाजता आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक बीएमसी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वात केलेल्या कारवाईत 1:02 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी 108 रुग्णवाहिका घटनास्थळी स्टँडबाय ठेवण्यात आली होती.
इमारतीच्या पहिल्या आणि 16व्या मजल्यांदरम्यान असलेल्या इलेक्ट्रिक डक्टमधील विद्युत तारा आणि केबलला ही आग लागली. मात्र आग आणि धुरामुळे गुदमरल्याने चौघांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी महेंद्र शहा (70) यांना मृत घोषित केले. तर रंजना राजपूत (59), शिवानी राजपूत (26) आणि शोभा सावळे (70) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तत्पूर्वी, बुधवारी सकाळी मुंबईतील जोगेश्वरी भागात एका बहुमजली इमारतीला आग लागल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. धुरामुळे एका ज्येष्ठ नागरिकासह चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.