Sinhgad Institute : पुणे येथील प्रसिद्ध ‘सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’ (STES) मधील आर्थिक गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांचे थकीत पगार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत दाखल करण्यात आलेल्या शेकडो याचिकांवर (Writ Petition No. 9975 of 2026 आणि इतर संलग्न याचिका) 25 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत.
ट्रस्टी आणि सदस्यांना परवानगीशिवाय बाहेर जाण्यास बंदी
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) अनिल सिंह यांच्या विनंतीवरून, सिंहगड संस्थेचे सर्व विश्वस्त (Trustees) आणि सदस्यांना संबंधित तपास अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यक्षेत्राबाहेर (territorial jurisdiction) न जाण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
CBI आणि ED कडून सखोल तपास सुरूच राहणार
संस्थेला राज्य शासनाकडून मिळालेला निधी, संस्थेची बँक खाती, त्यात जमा झालेली रक्कम आणि काढण्यात आलेले पैसे याचा तपशील देणारी 5 प्रतिज्ञापत्रे (Affidavits) संस्थेच्या वतीने सादर करण्यात आली. या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून पुढील सुनावणीत अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ED) देण्यात आले आहेत.
विश्वस्तांच्या संख्येबाबत न्यायालयाची दिशाभूल
धर्मादाय आयुक्तांच्या (Charity Commissioner) कार्यालयातील नोंदीनुसार, संस्थेत प्रत्यक्षात सुमारे 11 विश्वस्त आणि 34 सदस्य असल्याचे समोर आले आहे. मात्र, संस्थेने न्यायालयाला केवळ 4 ते 5 विश्वस्त असल्याचे भासवून दिशाभूल केल्याबद्दल कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, 1194 पासून प्रलंबित असलेले 72 बदल अर्ज (Change Reports) आणि विविध बँकांकडून घेतलेल्या 24 मोठ्या कर्जांचीही आता चौकशी होणार आहे.
परदेशी नागरिक असलेल्या विश्वस्ताची नोंद
संस्थेचे विश्वस्त डॉ. रोहित मारुती नवले हे परदेशी नागरिक (Foreign National) असूनही ते अद्याप ट्रस्टी पदावर कायम असल्याची गंभीर दखल कोर्टाने घेतली आहे. त्यांचे रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत कोर्टाचा संताप (MUHS आणि NMC ला दणका)
सिंहगड संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (Medical College) शैक्षणिक कामकाज ऑक्टोबर 2026 पासून पूर्णपणे ठप्प झाले असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या वकिलांनी कोर्टात दिली. याप्रकरणी 20 नोव्हेंबर रोजी आदेश देऊनही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) अद्याप पाहणी करून अहवाल न दिल्याने कोर्टाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जर पुढील सुनावणीपर्यंत महाविद्यालयाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर केला नाही, तर MUHS चे कुलसचिव (Registrar) आणि NMC च्या सचिवांना 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील सुनावणी
राज्य शासनाने न्यायालयात जमा केलेल्या निधीचे वाटप कसे करायचे आणि इतर प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाने 9 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजेची पुढील तारीख निश्चित केली आहे.
न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून थकीत वेतनासाठी लढणारे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.






