Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक खास आठवण सांगितली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपल्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्याने उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.
गर्लफ्रेंडला घेऊन गेले होते कॅम्ब्रिजमधील रेस्टॉरंटमध्ये!
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आई सोनिया गांधी आणि वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रेमकथेची आठवण सांगितली. राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची पहिली भेट इंग्लंडमधील कॅम्ब्रिज येथील ‘द वर्सिटी रेस्टॉरंट’मध्ये झाली होती. या ठिकाणाशी त्यांच्या प्रेमकथेच्या सुरुवातीच्या आठवणी जोडलेल्या आहेत.
राहुल गांधी यांनी सांगितले की, अनेक वर्षांनंतर जेव्हा ते स्वतः शिक्षणासाठी कॅम्ब्रिजमध्ये होते, तेव्हा त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
‘मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हटलं, चल आपण वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये जाऊया. तिला या रेस्टॉरंटबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र, माझे आई-वडील ज्या ठिकाणी पहिल्यांदा भेटले होते, ते ठिकाण मला पाहायचे होते,’ अशा आशयाचा किस्सा राहुल गांधी यांनी सांगितला.
रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यालाही होती राजीव-सोनिया यांची ओळख!
या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर घडलेला आणखी एक मजेशीर प्रसंग राहुल गांधी यांनी सांगितला. ते रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्याने त्यांना किती जण आहात, अशी विचारणा केली. त्यानंतर राहुल गांधी आणि त्यांची गर्लफ्रेंड दोघेही टेबलवर बसले.
मेन्यू पाहताना राहुल गांधी यांनी तेथील कर्मचाऱ्याला सांगितले की, माझे आई-वडील याच रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. हे ऐकताच त्या कर्मचाऱ्याने त्यांना ओळखल्याप्रमाणे प्रतिक्रिया दिली. ‘अरे, त्या दोघांना मी ओळखतो. कर्मचाऱ्याच्या या प्रतिक्रियेने राहुल गांधी यांनाही आश्चर्य वाटले. अनेक वर्षांनंतरही त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या आई-वडिलांच्या आठवणी जिवंत असल्याचे या प्रसंगातून दिसून आले.
चिकनच्या डिशवरून राहुल गांधींचा मजेशीर सल्ला!
या किस्स्यातील सर्वात मजेशीर भाग म्हणजे रेस्टॉरंटमधील जेवण. राहुल गांधी यांनी कर्मचाऱ्याला कोणता पदार्थ चांगला आहे, असे विचारले असता त्याने ‘चिकन शासूर’ (Chicken Chasseur) हा पदार्थ सुचवला. त्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या गर्लफ्रेंडने तोच पदार्थ मागवला. मात्र, जेवणाचा अनुभव त्यांना फारसा आवडला नाही.
यावर राहुल गांधी यांनी उपस्थितांना मिश्किलपणे सल्ला दिला की, प्रेमात पडायचे असेल तर वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये नक्की जा पण तिथे चिकन शासूर मात्र अजिबात खाऊ नका. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हशा पिकला. सोनिया गांधी यांनाही हसू आवरता आले नाही.
‘ती आता माझी मैत्रीण’; राहुल गांधींचे उत्तर चर्चेत
राहुल गांधी यांनी गर्लफ्रेंडचा उल्लेख केल्यानंतर माध्यमांमध्ये या विषयाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर एका पत्रकाराने त्यांना थेट प्रश्न विचारला की, राहुलजी, ती गर्लफ्रेंड आता कुठे आहे?
या प्रश्नावर राहुल गांधी यांनी स्मितहास्य करत मजेशीर उत्तर दिले. ‘ती आता माझी मैत्रीण आहे,’ असे ते म्हणाले. त्यांच्या या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सोनिया आणि राजीव गांधी यांच्या प्रेमाचीही सांगितली आठवण
या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी केवळ स्वतःच्या आठवणी सांगितल्या नाहीत, तर आई-वडिलांच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळ्याचे अनेक प्रसंगही उलगडले. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरात प्रत्येक जेवणाच्या वेळी वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर आई सोनिया गांधी बसलेल्या असायच्या. लहानपणी त्यांना हे अगदी सामान्य वाटत असे. मात्र, मित्रांच्या घरी गेल्यानंतर त्यांना असे दृश्य दिसत नसे. त्यामुळे आपल्या मित्रांना त्यांच्या आई-वडिलांबद्दलही ते आश्चर्याने प्रश्न विचारत असत. तसेच राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील प्रेम, त्यांचे एकमेकांवरील प्रेमळ नाते आणि कुटुंबातील आठवणी राहुल गांधी यांनी उपस्थितांसमोर मांडल्या.
आईच्या संघर्षाचेही केले कौतुक
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचाही उल्लेख केला. आजी इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतर वडील राजीव गांधी यांच्या हत्येमुळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद प्रसंगांची आठवण त्यांनी सांगितली. या सर्व संकटांमध्ये सोनिया गांधी यांनी दाखवलेले धैर्य आणि संयम यांचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. आपल्या आईने आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला, मात्र कधीही हार मानली नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.






