Vikhe Patil : बायोसीबीजी प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्याना दिलेले पाठबळ आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वपूर्ण असून, उर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास प्रकल्पाची निश्चित मदत होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याने प्रतिदीन १६ टन बायोसीबीजी प्रकल्प केंद्र सरकारच्या गोबर्धन योजनेतून उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील, व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठ, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर l, चेअरमन नंदूशेठ राठी, चेअरमन मकरंद गुणे,व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह शेतकरी सभासद अधिकारी उपस्थित होते.माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमिताने पाच लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ सहाय्यता निधीसाठी शासनाकडे सुपूर्त करण्यात आला.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,विखे पाटील कारखान्याने बायोसीबीजी प्रकल्प उभारण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे.उर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने टाकलेले पाउल आहे. शेतातील वाया जाणार्या कचऱ्याचा उपयोग करून हा प्रकल्प चालविला जाईल.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने कचऱ्याचे रुपांतर उर्जामध्ये करण्याचा प्रयत्न आहे.
बायो सीबीजी प्रकल्प देशाच्या उर्जा सुरक्षेसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उर्जा स्वावलंबनाचे आणि पर्यावरण पूरक विकासाचे उद्दिष्ट दिले आहे.हरीत उर्जा निर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिरीक्त उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होण्यास मदत होईल.
चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे कारखान्याचे विस्तारीकरण झाले.अतिशय कमी कालावधीत झालेले हे काम म्हणजे देशातील विक्रम आहे.नव्या प्रकल्पामुळे गळीत हंगामाची यशस्वी सुरूवात झाल्याचे समाधान व्यक्त करून भविष्यात साखर कारखानदारीचे अर्थकारण यशस्वी करायचे असेल तर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादनाला अधिक प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे डॉ विखे पाटील म्हणाले.
कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून सहकारी साखर कारखान्यांना मोठे पाठबळ मिळत असून,नव्या प्रकल्पातून एक लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण करणारा आपला कारखाना राज्यात प्रथम स्थानी आहे.बायो सीबीजी प्रकल्प शेतकरी हिताचा असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात कारखान्याने गळीत हंगामाच्या केलेल्या नियोजनाचे कौतुक करून, सर्वाच्या सामुहीक प्रयत्नांना मिळत असलेली साथ महत्वाची आहे.सहकारी साखर कारखानदारीच्या समोर आव्हान असली तरी नव्या प्रयोगातून सहकारी साखर कारखानदारी टिकवून ठेवण्यासाठी होत असलेले प्रयत्न पुढच्या पिढीच्या नेतृत्वाखाली यशस्वी होत असल्याचे म्हणाले.






