DNA मराठी

Pune Municipal Corporation : पुणे पालिकेत नोकरीच्या आमिषाने पावणेतीन कोटींची फसवणूक; जेजुरी देवस्थानच्या विश्वस्ताला अटक

pune municipal corporation

Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेत सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणांची पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई करत जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून या घटनेमुळे पुणे व जेजुरी भागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. पालिकेत चांगल्या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४ हून अधिक तरुणांकडून तब्बल २ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आली. नोकरीच्या आशेने अनेक तरुणांनी कर्ज काढून व उसनवारी करून ही रक्कम आरोपींकडे सुपूर्द केली होती.

तरुणांना शंका येऊ नये म्हणून टोळीने पालिकेचे खोटे लेटरहेड, बनावट शिक्के व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोगस सह्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे तयार केली होती. याशिवाय बनावट ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही देण्यात आल्या. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीचे काही महिने उमेदवारांच्या खात्यावर पगाराच्या नावाने परस्पर रक्कम जमा करण्यात येत होती.

दरम्यान, हा संपूर्ण घोटाळा समोर आल्यानंतर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी शिवाजीनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासादरम्यान राजेंद्र खेडेकर यांच्यासह पालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि नमिता बनसोडे यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. या रॅकेटमध्ये प्रशासनातील इतर घटकांचा सहभाग आहे का, तसेच आणखी काही तरुणांची फसवणूक झाली आहे का, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *