Kirit Somaiya : महाराष्ट्रात अनेक हिंदू मंदिरांजवळ बांग्लादेशी मुस्लिम माफिया, ड्रग माफिया, फेरीवाले कब्जा घेतात. अडथळे निर्माण करतात. नेवासे येथील घटनाही त्यातील एक भाग आहे. मला याचा राग आला. मी जिल्हा प्रशासनाकडे संताप व्यक्त केला आहे. ठरवून मुस्लिम अतिक्रमणे सुरू आहेत, असे मत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी व्यक्त केले.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल (ता. ३०) नेवासे येथे जाणून पैस खांब मंदिराला भेट देत दर्शन घेतले. त्यानंतर नागरिकांनी त्यांना मंदिर परिसरातील अतिक्रमणांबाबत निवेदन दिले. या संदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली. या घटनाक्रमाची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना देताना हे वक्तव्य केले.
ते पुढे म्हणाले की, नगरपालिकेने सरकारी कामात अडथळ्याबाबत तक्रार केली नाही. पोलिसांनीही ज्याला मारहाण झाली त्याची केवळ तक्रार घेतली, स्वतः काहीच केले नाही. म्हणून मी पोलीस व नगरपालिकेला २४ तासांचा इशारा दिला आहे. २४ तासांत सरकारी कामात अडथळा, सरकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, छेडछाड हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या मागील माफिया किंगवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
२४ तासांनंतर येथे एक जरी मुस्लिम बांग्लादेशी फेरीवाला बसला तर त्याला नगरपालिका व पोलीस प्रशासनाला जाब द्यावा लागेल. अनेक वर्षांपासून दंगे होतील, अशी शासन-प्रशासनात प्रवृत्ती तयार झाली आहे. मुंबईतही पोलिसांनी अशीच नौटंकी केली. हे आम्हा आता सहन करणार नाही. मुस्लिम फेरीवाल्यांनी हिंदू भक्तांना मारहाण केली, त्यावेळी पोलिसांनी बोटचेपीची भूमिका का घेतली, याबाबत मी पोलीस प्रशासनाला जाब विचारला आहे, असे त्यांनी सांगितले.
जर नेवासे येथील मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई झाली नाही तर मी स्वतः मंदिर परिसरात येऊन आंदोलन करणार आहे. मंदिर परिसरात एकही मुस्लिम फेरीवाला, बांग्लादेशी माफिया दिसता कामा नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले.






