Ahilyanagar Crime: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदिवसा गोळ्या झाडून अॅड. रियाज पठाण यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींना अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. तब्बल १३ वर्षांपासून गाजत असलेल्या या बहुचर्चित खून खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी सातही दोषींना मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद या निकालात निर्णायक ठरला. १६ सप्टेंबर २०१३ नेवासा तहसील कार्यालयाचा परिसरात भरदिवसा बंदुकीच्या गोळ्यांचा थरार! अॅड. रियाज पठाण यांच्यावर आरोपी प्रवीण खर्चन याने पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडल्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी पठाण यांचे हात पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीतून समोर आले.
या हल्ल्याने नेवासा तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गोळीबारानंतर गंभीर जखमी अवस्थेत अॅड. पठाण यांना उपचारासाठी नेवासा येथून अहिल्यानगरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रवीण खर्चन याला पिस्तुलासह ताब्यात घेतले.
एका साक्षीचा गैरसमज आणि आखला हत्येचा कट
एका खून खटल्यात अॅड. रियाज पठाण यांनी साक्ष दिल्याच्या गैरसमजातून आरोपींनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सरकारी पक्षाने ठेवला होता. नेवासा पोलिसांनी या प्रकरणात एकूण १२ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.खटल्यादरम्यान सरकार पक्षाने तब्बल २९ साक्षीदार तपासले.प्रत्यक्षदर्शी साक्ष, वैद्यकीय अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने सात आरोपी दोषी ठरवले.
निकमांचा युक्तिवाद; आरोपींचे बचावाचे दावे फोल
मुख्य आरोपी प्रवीण खर्चन याने घटनेच्या वेळी आपण अज्ञान अर्थात नाबालिक असल्याचा दावा करून खटला चालविण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी हा दावा सप्रमाण खोडून काढत आरोपी सज्ञान असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध केले.
मोहन लष्करे आणि सादिक शेख यांनी घटनेच्या वेळी आपण नेवासा फाटा येथे असल्याचा दावा केला होता. मात्र, उलटतपासणीत त्यांचा हा दावा टिकला नाही. आरोपींच्या बचावाकडून पठाण गँग आणि गाढे गँगमधील वैमनस्यातून ही हत्या झाली असा युक्तिवाद करण्यात आला मात्र सरकारी पक्षाने हा दावाही पुराव्यांच्या आधारे खोडून काढला. अॅड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केवळ दोषींविरोधातील भक्कम पुराव्यांवरच भर दिला नाही, तर ज्या पाच आरोपींविरोधात कटातील सहभागाचा प्रत्यक्ष व ठोस पुरावा उपलब्ध नाही, त्यांना निर्दोष सोडण्याची भूमिकाही स्पष्टपणे मांडली. न्यायालयाने ही बाब ग्राह्य धरत पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
न्यायालयाने प्रवीण खर्चन, मोहन लष्करे, रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे, पवन नरुल्ला, सचिन चव्हाण आणि सादिक बशीर शेख या सात आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. तर अशोक जगताप, सत्यवान सोनकांबळे, विलास जिरे, सोपान गाढे आणि सुनील ऊर्फ सोन्या परदेशी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.१७ नोव्हेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या या प्रदीर्घ खटल्याच्या सुनावणीला अखेर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला आहे. तब्बल १३ वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या त्या थरारक हत्येचा निकाल लागल्याने पठाण कुटुंबीयांसह नेवासा परिसराचे या निकालाकडे लक्ष लागले होते. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. परिमल फळे यांनी सहाय्य केले.






