Kangana Ranaut on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानासारख्या अतिसंवेदनशील परिसरात आंदोलन करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देशभरात विविध विद्यार्थी संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे तसेच लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी व काँग्रेसचे अनेक खासदार सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत सरकारवर टीका करण्यात आली आणि पंतप्रधान तसेच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौत म्हणाल्या की, देशाच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. अशा ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी मागणे किंवा तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार असला तरी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ठिकाणांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
कंगना यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत, विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत अशा कृतीमुळे चुकीचा संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, काँग्रेसने आपल्या आंदोलनाचे समर्थन केले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि विविध मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार असल्याचा दावा पक्षाने केला आहे.
या प्रकरणामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, कंगना रणौत यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी रंग चढला आहे.






