Sunetra Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या बैठकीची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, याबाबत सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत जाब विचारल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना या बैठकीची पूर्वकल्पना नसल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी थेट तटकरे यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हा केवळ गैरसमज असून बैठकीबाबत कोणताही गुप्त अजेंडा नव्हता. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना ‘देवगिरी’ येथे बोलावले होते आणि त्यानंतर पुढील घडामोडी झाल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडील काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरूनही पक्षात मतभेद समोर आले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिकरीत्या पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा केला असला, तरी या नव्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संवाद आणि समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.






