DNA मराठी

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री?

shrikant shinde

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका नेत्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दिल्लीतील घडामोडींवर लागल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *