Pune Rain Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत माहिती दिली.
गेल्या तीन दिवसांपासून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 22 ठिकाणी दरडी कोसळल्या असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विविध भागांत अडकलेल्या तब्बल 4 हजार 568 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
उद्याही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन एनडीआरएफ आणि चार पीडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
शाळांना सुट्टी जाहीर
परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉईंट ही पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने देहू आणि आळंदी येथून वारकऱ्यांनी प्रवास टाळून थेट पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केले.






