Madhya Pradesh Jailer : तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी आलेला एक कैदी आणि त्याच्यावर प्रेम करणारी त्याच तुरुंगातील उपजेलर ऐकायला चित्रपटातील कथानक वाटावं, पण ही घटना मध्यप्रदेशातील सतना केंद्रीय कारागृहातील असल्याचं सांगितलं जात आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारी अधिकारी आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी यांच्यात निर्माण झालेलं नातं अखेर विवाहबंधनात अडकलं.
फिरोजा खातून या सतना केंद्रीय कारागृहात उपजेलर म्हणून कार्यरत होत्या. शिस्त, कर्तव्य आणि कायद्याचं काटेकोर पालन ही त्यांची ओळख. याच कारागृहात धर्मेंद्र सिंह हा कैदी शिक्षा भोगत होता. 2007 मध्ये नगरपरिषद उपाध्यक्षाच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कारागृहातील वॉरंट शाखेची जबाबदारी फिरोजा खातून यांच्याकडे होती. धर्मेंद्र कागदपत्रांच्या कामात मदत करत असल्याने दोघांचा संपर्क वाढला. कामापुरतं सुरू झालेलं बोलणं हळूहळू मैत्रीत बदललं आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
2022 मध्ये धर्मेंद्रच्या वर्तणुकीत सुधारणा झाल्याचं लक्षात घेऊन त्याची वेळेपूर्वी सुटका करण्यात आली. 14 वर्षांचा तुरुंगवास संपल्यानंतर तो बाहेर आला, मात्र फिरोजासोबतचं नातं अधिक दृढ झालं. अखेर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला.
या लग्नासमोर अनेक अडथळे होते. धर्म वेगळा, सामाजिक पार्श्वभूमी वेगळी आणि सर्वात मोठा अडथळा म्हणजे समाजाचा विरोध. मुस्लिम महिला अधिकारी आणि हिंदू माजी कैदी यांचा विवाह कुटुंबीयांना मान्य नव्हता. फिरोजा यांच्या घरच्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला.
मात्र, दोघांनीही समाजाच्या दबावापेक्षा आपल्या नात्याला प्राधान्य दिलं. 5 मे रोजी छतरपूर येथे हिंदू रीतीरिवाजांनुसार हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे, फिरोजा यांच्या कुटुंबीयांनी साथ न दिल्याने बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी पुढे येत कन्यादानाची जबाबदारी स्वीकारल्याची चर्चा आहे.
वैदिक मंत्रोच्चारात, अग्नीला साक्षी ठेवून उपजेलर फिरोजा खातून यांनी धर्मेंद्र सिंहसोबत सात फेरे घेतले. कायद्याच्या रक्षकाने जन्मठेपेच्या कैद्याला जीवनसाथी म्हणून स्वीकारल्याने ही प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रेम खरंच आंधळं असतं का, की माणसातील बदल ओळखण्याची ताकद त्यात असते? एका माजी गुन्हेगाराला समाजाने आणि कायद्याच्या रक्षकाने अशी दुसरी संधी देणं योग्य आहे का, यावर आता विविध स्तरांत चर्चा सुरू झाली आहे.






