Rohit Pawar on Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेतला मोठा पक्ष भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो असा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
सत्तेतला एक मोठा पक्ष सोडला तर संपूर्ण महाराष्ट्राने भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा निषेध केला आहे, सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून या भोंदूला पाठीशी घालण्याचं कारण काय ? महाराष्ट्राचा आधार असलेल्या महामानवांपेक्षा भोंदू धीरेंद्र शास्त्री या मोठ्या पक्षाला मोठा वाटतो का ?
हा मोठा पक्षच या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचे कार्यक्रम स्पॉन्सर करतो, अशी देखील चर्चा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महामानवांची भूमी आहे, इथे बाहेरून असले भोंदू बोलवायची गरजच काय ?
नागपुरात या भोंदू बाबाचा कार्यक्रम अद्यापही सुरूच आहे, हे लाजिरवाणे नाही का ? महाराष्ट्राच्या अस्मितेशिवाय कोणीही मोठा नाही हे दाखवून देत सरकारने या भोंदू धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम बंद करावा आणि यापुढे महाराष्ट्रात त्याला कायमची बंदी घालावी अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा असं म्हटलं, असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला. पुढे रामदास स्वामींनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरू’ असं सांगत पुन्हा मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असं ते म्हणाले.





