Pankaja Munde : बीडच्या अंबाजोगाई येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा थेट तुरुंगातच असते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचं सांगताना, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. “ज्याची ऐपत दहा पैशांची आहे, त्याने पंधरा पैसे कमवा… पण चुकीच्या मार्गाने शंभर रुपये कमवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा तुरुंगातच आहे,” असं त्या म्हणाल्या.
तसेच, “मला चुकीची कामं सांगू नका… घरात पैसे कुठून येतात, याचा हिशोब ठेवा,” असा सज्जड दमही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राजकारणातील कारस्थानांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो हे तुम्हाला माहित आहे… माझ्या मनात पाप नाही, देवाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.”
निवडणुकीतील पराभवाचं उदाहरण देत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना सांगितलं की, राजकारणात पराभव होत असतो, पण चुकीचं वागणारे लोक नकाशावरून गायब होतात.






