DNA मराठी

Ahilyanagar Municipal Corporation: विखे की कर्डिले? अहिल्यानगरच्या निर्णयातून उलगडणारा राहुरीचा अदृश्य मतदारसंघ

sujay vikhe

Ahilyanagar Municipal Corporation : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौरपदी ज्योती गाडे यांची सव्वा वर्षासाठी झालेली निवड केवळ महापालिकेपुरती मर्यादित राजकीय घटना मानणे भोळेपणाचे ठरेल. ही निवड स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तावाटपापेक्षा अधिक, जिल्ह्यातील येऊ घातलेल्या राजकीय हालचालींचा पूर्वसंकेत आहे. विशेषतः राहुरी मतदारसंघात स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अधिक अर्थवाही ठरते.

राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री असताना, भाजपचे जिल्ह्यातील राजकारण विखे कुटुंबाच्या अवतीभवती फिरत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचवेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या वाढत्या हालचाली, विशेषतः राहुरी मतदारसंघातील घाटाखालच्या गावांतील सततचे दौरे, गाठीभेटी आणि सामाजिक संपर्क, हे सगळे केवळ योगायोग म्हणून पाहता येणार नाही.

राहुरी मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचे पारंपरिक वर्चस्व आहे. ‘मारणारा-मानणारा’ असा मोठा वर्ग आजही या घराण्याशी जोडलेला आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी कोणतीही मोठी संस्थात्मक उभारणी न करता, केवळ जनसंपर्क, उपस्थिती आणि व्यक्तिगत नात्यांच्या जोरावर या मतदारसंघात आपली पकड निर्माण केली होती. बाणेश्वर संस्थेपुरते मर्यादित कार्यक्षेत्र असतानाही, जनतेशी थेट संवाद ठेवत त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय अवकाश तयार केला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अजूनही भरून निघालेली नाही.

याच पोकळीतून भाजपकडून स्वर्गीय आमदारांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव पुढे येत आहे. सहानुभूतीचा घटक, कर्डिले घराण्याची ओळख आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राजकारणात सहानुभूती ही कायमस्वरूपी भांडवल ठरत नाही, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे.

याचवेळी माजी खासदार सुजय विखे किंवा धनश्री विखे यांची नावे चर्चेत असणे, हे भाजपच्या अंतर्गत सत्तासंतुलनाचे सूचक आहे. ‘विखे की कर्डिले’ ही चर्चा केवळ व्यक्तींची नाही, तर जिल्ह्यात भाजपचा चेहरा कोण असावा, याविषयीची आहे. महापालिकेतील घडामोडी याच संदर्भात पाहाव्या लागतील.

महानगरपालिकेच्या सत्तेचे सूत्र आमदार संग्राम जगताप यांच्या खांद्यावर देण्यात आले होते. महापौर निवडीपासून ते सत्ता-समीकरणांपर्यंत, अंतिम निर्णय त्यांच्याच भूमिकेवर अवलंबून राहिला. अशा परिस्थितीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची कन्या आणि गाडे कुटुंबाची सून असलेल्या ज्योती गाडे यांची महापौरपदी निवड, ही केवळ कौटुंबिक किंवा स्थानिक समतोल साधणारी बाब नाही, तर कर्डिले गटाला दिलेला एक राजकीय ‘संकेत’ म्हणूनही पाहिली जात आहे. त्याचवेळी विखे पाटील घराण्याचे नाव या निवडीभोवती फिरणे, हे सत्तेतील अदृश्य हात स्पष्ट करते.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार आणि माजी मंत्री प्रसाद तनपुरे हेही या सगळ्या गणितात एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांनी जर “तीन वर्षांसाठी आमदार व्हायचे कशाला?” असा राजकीय निर्णय घेत माघार घेतली, तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण होते. मात्र, अशा माघारीचा निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून, तो व्यापक राजकीय भाग असू शकतो.

अहिल्यानगरच्या महापौरपदाची निवड त्यामुळे एका नगरसेविकेपुरती मर्यादित राहत नाही. ती राहुरीच्या आगामी पोटनिवडणुकीचा ट्रेलर ठरते. सत्तेची केंद्रे, घराणी, सहानुभूती आणि संधीसाधूपणा या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर आज जिल्ह्याचे राजकारण उभे आहे. प्रश्न एवढाच आहे की, या संघर्षात जनतेचा मुद्दा केंद्रस्थानी राहतो की पुन्हा एकदा सत्ताकारणाचाच खेळ वरचढ ठरतो?

अहिल्यानगरच्या राजकारणाचे उत्तर लवकरच राहुरीच्या रणांगणात मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *