Ajit Pawar Death: बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि आर. आर. पाटील (आबा) यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उभ्या राहिलेल्या पोकळीची जाणीव आधीच तीव्र होती. त्या परंपरेतील अजित पवार यांचे जाणे ही केवळ एका नेत्याची अनुपस्थिती नाही, तर एका विशिष्ट राजकीय संस्कृतीचा अस्त होत चालल्याची खंत आहे. ही खंत अधिक बोचरी ठरते कारण अशा नेतृत्वाचा पर्याय आजच्या राजकारणात सहज दिसत नाही.
एक काळ असा होता की राजकीय भाषण ऐकण्यासाठी सर्वसामान्य माणूस स्वतःच्या पैशातून प्रवास करून मैदानात येत असे. त्या भाषणांतून केवळ घोषणा नव्हे, तर विश्वास आणि दिशा मिळायची. आज भाषणे होतात, गर्दीही जमते; मात्र त्या गर्दीचे रूपांतर विश्वासात आणि मतांमध्ये होताना दिसत नाही. राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आजही आहेत. त्यांच्या भाषणांना मोठी गर्दी होते, पण राजकीय समीकरणे जुळवण्यात आलेल्या मर्यादांमुळे ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचत नाही. वक्तृत्व आणि सत्तेची गणिते यातील ही दरी आजच्या राजकारणाचे वास्तव आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे नेतृत्व वेगळ्या ठिकाणी उभे राहते. ते भाषणांपेक्षा कामातून ओळखले गेले. कामातील तत्परता, वेळेचे काटेकोर पालन आणि निर्णयक्षमतेचा ठामपणा ही त्यांची ओळख होती.
कार्यक्रमाचा वेळ म्हणजे वेळ कुणी उपस्थित असो वा नसो, काम ठरलेल्या क्षणीच सुरू होणार, हा त्यांचा स्वभाव होता. राजकारणात जिथे शब्द फिरवणे आणि भूमिका बदलणे सहज स्वीकारले जाते, तिथे अजित पवार यांचे स्पष्ट आणि थेट बोलणे अनेकांना अस्वस्थ करणारे ठरले.
अजित दादा हे राजकारणात स्पष्ट आणि खरं बोलणारे नेते होते. मात्र आजच्या राजकारणात एवढी प्रामाणिकता अनेकदा अडचणीची ठरते. इथे कपटी शब्दांची, अर्थ बदलण्याची आणि मनात एक-ओठांवर एक ठेवण्याचीच चलती असते. अजित पवार यांना त्यांच्या खरं बोलण्याचा फटका अनेकदा बसला. मनात एक आणि बाहेर दुसरे असे वागणे त्यांना कधी जमले नाही. त्यामुळे तोटा होतो आहे, याची जाणीव असूनही त्यांनी कधी त्याची पर्वा केली नाही. राजकारणात फायदा-तोट्याच्या गणितांपेक्षा कामाला आणि शब्दाला महत्त्व देणारा हा स्वभाव आज दुर्मीळ झाला आहे.
याच प्रामाणिकपणामुळे ते ‘महाराष्ट्राचे न झालेले मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले गेले. पद मिळाले नाही, पण लोकांचा ओघ कधी थांबला नाही. मंत्रालयात गर्दी दिसली, तर सहज समजायचे – अजित पवार आपल्या कार्यालयात आहेत. सत्तेच्या खुर्चीशिवायही प्रभाव निर्माण करणारा नेता म्हणजे काय, याचे ते जिवंत उदाहरण होते.
अजित पवार यांचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि विशेषतः सर्वसामान्य माणसासाठी मोठे नुकसान आहे. आजचे राजकारण प्रतिमा, प्रचार आणि तात्कालिक फायद्यांभोवती फिरत असताना, शिस्त, स्पष्टता आणि शब्दाची किंमत ही मूल्ये मागे पडत चालली आहेत. म्हणूनच हा प्रश्न व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही; तो काळाचा आणि राजकीय संस्कृतीचा आहे. आजच्या राजकीय वास्तवात असा नेता पुन्हा घडेल का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे, आणि हीच या काळाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.






