Harshwardhan Sapkal: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे.
या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे.
मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे.
हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.






