Karnataka DGP Viral Video : कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठी कारवाई करत कर्नाटकचे पोलीस महासंचालक के. रामचंद्र राव निलंबित केले आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे के. रामचंद्र राव यांनी व्हायरल व्हिडिओ फेक असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या व्हिडिओची फॉरेन्सिक चौकशीची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
के. रामचंद्र राव यांच्यावर व्हिडिओमध्ये महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव इतर महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत खुर्चीवर बसलेले दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राव कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना भेटण्यासाठीही गेले होते, परंतु बैठक अयशस्वी झाली.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड करण्यात आला आणि तो कोणी प्रसारित केला याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, व्हिडिओचा स्रोत आणि सत्यता निश्चित करण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. हे फुटेज डिजिटल पद्धतीने हाताळण्यात आले आहे का हे शोधण्यासाठी सायबर गुन्हे तज्ञांचीही मदत घेतली जाईल. या घटनेने राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.






