DNA मराठी

Nana Patole : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; नाना पटोलेंची मागणी

nana patole

Nana Patole: राज्यात नुकत्याच झालेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे.

देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणाले की, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे.

अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला, त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतीला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत, या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे म्हणून जनभावनेचा विचार करून या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे नाना पटोले या पत्रात म्हणाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *