Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे.
‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली.
याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.”
निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






