Buldhana News : तेलंगणा राज्यातून जळगात खान्देशातील लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा तिसऱ्या दिवशी अखेर शोध लागला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर भोलजी उड्डाणपुलानजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत त्यांच्या कारसह मृतदेह २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
तेलंगणातील सीतापूरममधील एका सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू, पाटील (४९) व त्यांची पत्नी नम्रता (४५) हे एमएच १३ बीएन ८४८३ या कारने डोकलखेडा येथील लग्न सोहळ्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झाले होते. सायंकाळी ६:३० वाजता त्यांचा नातेवाईकांशी शेवटचा संपर्क झाला, मात्र त्यानंतर दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाइकांत चिंता वाढली. पाटील दाम्पत्य लग्नस्थळी न पोहोचल्याने त्यांच्या महामार्गावरील विविध गावांत चौकशी करण्यात आली पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३१ वाजता त्यांनी बाळापूर टोलनाका पार केल्याचे स्पष्ट झाले, तर शेवटचे ‘लोकेशन’ नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे आढळले. त्यानंतर नांदुरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली व पोलिसांनी चौकशी सुरु केली. नांदुरा-मलकापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करूनही २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही. परिणामी, विविध चर्चांना ऊत आले होते. अखेर सायनलच्या सुमारास वडनेर उड्डाणपुलाजवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत चारचाकीसह पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले. माहिती मिळताच वरिष्ठ अधिका-यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
यांनतर 3 क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ओम साई फाउंडेशनच्या कार्यकत्यांना विहिरीत उतरवून सायंकाळपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्रथमदर्शनी महामार्गालगत ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी वळण आहे व रस्त्याच्या बाजूलाच १० फुटांवर ती विहीर आहे. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन विहिरीत पडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, हा घातपात आहे का? या बाजूनेही पोलिस तपास करीत आहेत.






