Shankarrao Gadakh : शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा नगरपंचायतची निवडणूक पक्षाचे मशाल चिन्हाऐवजी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री गडाख यांच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. गडाख आता शिवसेना सोडण्याची तयारी करत असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली आहे.
तर दुसरीकडे गडाख यांनी यापूर्वी सन 2017 मध्ये अपक्ष असताना क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले होते.
विधानसभेत विजयी झाल्यानंतर अपक्ष असलेले आमदार शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रिपद मिळवले होते. मात्र, आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.






