MPSC Exam 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जिल्ह्यातील २० परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.
परीक्षा उपकेंद्रांच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या परीक्षेसाठी एकूण ७ हजार ४५७ उमेदवार बसणार असून या कामकाजासाठी ५ उपजिल्हाधिकारी दर्जाचे समन्वय अधिकारी, १ उपजिल्हाधिकारी दर्जाचा भरारी पथकातील अधिकारी, २० उपकेंद्रप्रमुख (वर्ग १ अधिकारी), ७२ पर्यवेक्षक, ३५९ समवेक्षक, समन्वय अधिकारी व भरारी पथकांचे ६ सहायक, ४० लिपीक, २० केअरटेकर, २० बेलमन, २८ शिपाई, ७२ पाणी वाटप कर्मचारी आणि २८ वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ८.३० वाजल्यापासून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा कक्षात मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने आणणे व परीक्षा केंद्र परिसरात बाळगणे दोन्ही निषिद्ध आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून घ्यावीत; दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात येणार नाहीत.
तसेच परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व एस.टी.डी. बुथ, फॅक्स व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही आदेशात दिले आहेत.






