DNA मराठी

Ahilyanagar News : कोरोना काळातील धक्कादायक प्रकरण! पाच नामांकित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

doctor

Ahilyanagar News : कोरोना काळात रुग्णाच्या मर्जीविरुद्ध उपचार करून घेतल्याचा, अवाजवी बिल आकारल्याचा आणि मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा स्फोटक आरोप शहरातील पाच नामांकित डॉक्टरांसह डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टरांवर करण्यात आला आहे.

या प्रकरणात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अशोक खोकराळे यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणं दिसल्याने त्यांना न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णाच्या संमतीशिवाय जबरदस्तीने अॅडमिट करण्यात आलं, आरोग्यस्थितीची खरी माहिती लपवण्यात आली, आणि जाणूनबुजून जास्त प्रमाणात औषधं देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय रुग्णालयाकडून अवाजवी बिल आकारण्यात आलं, असा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे. परंतु सगळ्यात धक्कादायक आरोप म्हणजे, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली, आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

या प्रकरणात डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, तसेच डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल लॅबमधील तज्ञ डॉक्टर आणि काही अज्ञात कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

“कोरोना काळात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला, पण हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला याबाबत काहीच माहिती दिली नाही. आम्ही वारंवार संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.” संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत असून, वैद्यकीय व्यवसायातील नैतिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

या प्रकरणामुळे रुग्णांमध्ये भीती आणि अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांकडून आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *