Pune Crime News: पुण्यातील येरवडा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. माहितीनुसार, लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी चार जणांनी घरात शिरून एका महिलेस आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
फिर्यादी रहीसा महंमद शेख (वय 44, रा. कामराजनगर, येरवडा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जहूर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून, अचानक त्यांच्या घरात घुसले.
“माझ्या आईला का मारले?” असा प्रश्न विचारत जहूर शेख याने हातातील तलवारीने फिर्यादी महिला आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान केले तसेच शिवीगाळ करत दहशत निर्माण केली.
या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांनी पोलिसांकडून तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.