Ahilyanagar Crime News : कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणात आरोपी विनोद मोहन मुरकुटे (वय ३३, रा. मुरकुटे वस्ती) यास श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी शिक्षा सुनावली. भा.दं.वि. कलम ३२४ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम २७(१) अंतर्गत आणखी तीन वर्षे शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
प्रकरणाची हकीगत अशी की, ४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी प्रमोद आतार (वय १९, रा. आतारवस्ती, कर्जत) हा आपल्या चुलत चुलत्यासोबत उसाचे वाढे गोळा करत असताना, आरोपी विनोद मुरकुटे याने पिस्तुलातून गोळी झाडून फिर्यादीच्या पायावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला कर्जत, त्यानंतर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, ससून रुग्णालयातील डॉक्टर, वैज्ञानिक विश्लेषक महेश कदम तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकिल पुष्पा कापसे (गायके) यांनी केला.
सरकारी पक्षाने मांडलेल्या पुराव्यांचा स्वीकार करत न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी आशा खामकर यांनी सहकार्य केले.