Buldhana News : राज्यात सध्या मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून जोरदार राजकारण पहायला मिळत आहे. यातच आता हैदराबाद गॅझेटीयर आणि सीपी बेरार नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावा अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये हजारो बंजारा बांधव, भगिनी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. आपला पारंपारिक पोशाख, नृत्य आणि मागण्या संदर्भात घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज, रायसिंग महाराज, समाजाचे नेते हरिभाऊ राठोड, संजय राठोड यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला. ज्या पद्धतीने मराठा आंदोलनादरम्यान “एक मराठा लाख मराठा” असे घोषवाक्य पाहायला मिळाले, त्याच पद्धतीने “एक गोर, सव्वा लाखेर जोर” हे घोषवाक्य देखील पाहायला मिळालं.
सरकारने समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.