Om Raje Nimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता रात्रीच्या अंधारात घरावर अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हणण्याची पाळी आली आहे. त्यांच्या या धाडस आणि तत्परतेमुळे 10 जणांचा जीव वाचला आहे. वडणेर ता. परांडा येथील पाण्यात अडकलेल्यांच्या बचाव कार्याचा रात्रीच्या अंधारातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात वाहत्या खोल पाण्यात सर्वात पुढे जाऊन, पाईप झाडात अडकवताना, दोर ओढताना धाराशिवचे खासदार निंबाळकर दिसत आहेत.
22 सप्टेंबर ची ही संध्याकाळ, रेस्क्यू केलेले 4 नागरिक आणि बचाव पथकातील 6 जणांसाठी काळरात्र ठरली असती. पण खासदार ओम राजेंनी गावातील तरुणांनासोबत घेऊन केलेलं धाडस आणि समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. सोमवार 22 सप्टेंबर संध्याकाळच्या 7 ते 8 च्या दरम्यानची ही घटना आहे.
वडणेर (ता परांडा) येथील पाण्यात अडकलेल्या 4 जणांना घेऊन बचाव पथकाची बोट वापस निघाली होती. पण बोटीचे इंजिन प्रवाहात अचानक बंद पडले. त्यामुळे रेस्क्यू केलेले 4 जण आणि बचाव पथकातील 6 जणांना घेऊन निघालेली ही बोट पुराच्या प्रवाहात, पाण्याच्या वेगामुळे वाहत चालली. त्यावेळी तिथं एकच गोंधळ उडाला.
पण त्याचवेळी तिथे बचाव कार्यात सहभागी असलेले खासदार ओम राजे निंबाळकर आणि स्थानिक युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता वाहत्या पाण्यात उड्या मारल्या आणि दुसरा दोरखंड बोटीच्या दिशेने फेकून, वाहत जाणारी बोट एका झाडांला दोरखंडाने अडकवण्यात यश मिळवले. त्यानंतर दुसऱ्या दोरखंडाने बोट ओढून काढत मागील 24 तासापासून पाण्यात अडकलेल्या 4 जणांना आणि बचाव पथकातील 6 जणांना सुखरूप पणे बाहेर काढले. त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली.