Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत २२ हजार विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित केली आहेत. समितीच्या जलद निर्णय प्रक्रियेमुळे मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे हजारो विद्यार्थ्याना व अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सुयोग्य व्यवस्थापन यामुळे प्रमाणपत्रांचे वितरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
जातवैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विविध उपक्रम, त्रुटी पूर्तता शिबिरे, विशेष मोहीमा वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. यामध्ये आता १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या समितीमध्ये अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) रेश्मा माळी, सदस्य तथा उपायुक्त राकेश पाटील, व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी अनिल तिदमे यांची त्रिस्तरीय समिती जातवैधता पडताळणीचे काम जलद गतीने करत आहे.
त्यामुळेच १ जानेवारी २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे एकूण २५ हजार २७९ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी २२ हजार ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यामध्ये अनुसूचित जात (SC) वर्गातील ३ हजार १५१ पैकी २ हजार ८५८, विमुक्त जाती/भटक्या जमाती (VJNT) वर्गातील ५ हजार १३० पैकी ४ हजार २८७, इतर मागासवर्गीय (OBC) वर्गातील १४ हजार ३०८ पैकी १२ हजार ६८६, विशेष मागासवर्गीय (SBC) वर्गातील ८२० पैकी ६४३, तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (SEBC) वर्गातील १ हजार ८७० पैकी १ हजार ५३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अर्जदार स्तरावर त्रुटी पूर्ततेसाठी १ हजार ५७७ प्रकरणे प्रलंबित असून १ हजार ६९६ प्रकरणे निर्णय प्रक्रीयेत आहेत.
सद्यस्थितीत जिल्हा समिती परिपुर्ण जातदाव्याच्या प्रकरणांवर ३५ ते ४० दिवसांच्या आत निर्णय घेत आहे. ज्या प्रकरणांमध्ये कागदपत्रे आवश्यक आहेत त्याबाबत ऑनलाईन त्रुटी कळविण्यात आलेल्या असून अर्जदारांनी त्रुटी पुर्ततेची कागदपत्रे प्रत्यक्ष समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात समक्ष जमा केल्यानंतर सदर जातदाव्याचे प्रकरण तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही केली जात आहे.
अर्जदारांना आवाहन करण्यात येते की, जातदाव्याचे प्रकरण दाखल करतांना अर्जदारांनी विहित नमुन्यात नमुना 3 आणि नमुना १७ चे शपथपत्र कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावा.
मोडीभाषेतील पुरावे शासन मान्यता प्राप्त मोडी लिपी वाचकाच्या वतीने कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर करुन सादर करावे. साध्या पेपरवर टंकलिखीत केलेले शपथपत्र देखील समिती ग्राह्य धरत असल्यामुळे शपथपत्रासाठी स्टँम्प पेपरची आवश्यकता नाही. अर्जात नमूद केलेल्या वंशावळ शपथपत्रानूसार महसुली व शालेय पुराव्यांच्या प्रमाणित प्रती अर्जदाराने प्रस्तावासोबत उपलब्ध करुन दिल्यास संबंधित प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात येते.
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित अर्जदार व पालकांना आवाहन करण्यात येते की, सन 2025-2026 या वर्षाअखेरीस CET व्दारे प्रवेश घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी अर्जदारांनी वेळेवर धावपळ करण्याऐवजी तात्काळ महाविद्यालयांमार्फत प्रकरणे समिती कार्यालयाकडे जमा करावीत, जेणेकरुन व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी समितीवर येणारा अतिरिक्त ताण कमी होऊन अर्जदारांना देखील वेळेत जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने निर्गमित करणे सुलभ होईल.
महाविद्यालयांना सूचना
महाविद्यालयांनी जातदावा प्रकरणांसाठी विहीत फार्म नंबर १५ A वर महाविद्यालय प्राचार्यांची सही व शिक्यासह देण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमावा. विद्यार्थ्यांना जातदाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. समितीच्या वतीने दिलेल्या सुचना व माहिती पत्रकांची १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना माहिती देऊन सर्व पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज जमा करुन घ्यावे. जेणेकरुन १२ वी विज्ञान अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना व पालकांना पुढील शैक्षणिक हित साध्य करणे सुलभ होईल.
ही कागदपत्रे जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक
ऑनलाईन अर्ज, प्राचार्यांची स्वाक्षरी असलेला फॉर्म 15 A व महाविद्यालयाचे चालु वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, अर्जदार, वडील, आजोबा यांचे शालेय दाखले/ जातीविषयक महसुली पुरावे, जातदाव्यासाठी निश्चित केलेला मानीव दिनांकापुर्वीची कागदपत्रे, ज्यामध्ये अनुसूचित जाती करीता सन 1950, विजाभज साठी सन 1961, इमाव व विमाप्र करीता सन १९६७ पुर्वीचे जातनोंदी असलेले अहिल्यानगर जिल्ह्रयातील पुरावे, मोडी भाषेतील पुरावे असल्यास मोडी लिपीवाचकाकडून लिप्यांतर केलेले नोंदणीकृत शपथपत्र, वारसनोंदीसाठी 7/12 उतारे, फेरफार किंवा कडईपत्रक उतारे, नमुना 3 व नमुना 17 चे नोंदणीकृत मुळ शपथपत्र,
जात पडताळणी ऑनलाईन अर्जासाठी भरावे लागणारे
ऑनलाईन शुल्क
जात वैधता पडताळणीच्या शैक्षणिक प्रकरणासाठी शुल्क १०० रुपये, सेवाविषयक व निवडणूक कामासाठी ५०० रुपये शुल्क ऑनलाईन भरुन त्याची पावती व ऑनलाईन अपलोड केलेल्या कागदपत्रांचा सर्व जातीविषयक पुराव्यांची कागदपत्रे प्रस्तावासोबत समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. जातवैधता पडताळणीसाठी परिपूर्ण कागदपत्रे जमा केल्यास विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळते.