Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी भंडारदरा धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. दरम्यान भंडारदरा धरणातुन २० हजार ७६३ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक होत असुन धरणातील पाणी पातळी नियत्रीत ठेवण्यासाठी निळवडे धरणातुन ८ हजार ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अभियंता प्रविण भांगरे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात भंडारदरा धरण पाणलोट परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे १५ आँगस्टला भंडारदरा धरण भरण्याचा विक्रम मोडला होता. परंतु सोमवार पासून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावासाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात मान्सून सक्रिय झाला आहे. डोंगरदर्या धुक्याने लेपाटून गेल्या असून धबधबे जोमाने वाहत असून छोट्या नद्या, नाले खळखळून धरणात विसावत आहेत.
बुधवारी भंडारदरा धरण भरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.तर निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहे निळवंडे धरणातून एकूण ८ हजार ६०० क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात झेपावत आहे. त्यामुळे प्रवरा नदी वाहती बनली आहे. आणि नवीन पाण्याची आवक निळंवडे धरणात वाढत असल्याने निळंवडे धरण लवकरच भरणार असल्याचे वर्तविले जात आहे.