सभागृहात आमदारांनी हातघाई केली, बूटफेक झाली, आणि सगळ्यात वाईट म्हणजे, काही आमदारांनी बाहेरून बॉडीगार्ड म्हणून गुंड आणल्याचं आरोपांनी स्पष्ट केलं.
मुंबई – “आम्ही भाजपमध्ये काम करतो. हा सुसंस्कृत पक्ष आहे. हा मार खाणारा पक्ष नाही, तर सर्जिकल स्ट्राईक करणारा पक्ष आहे!” हे वाक्य वाचून आमचं पहिलं काम होतं ते म्हणजे चहाचा घोट थांबवणं. कारण तो घोट जर घेतला असता, तर हशा येऊन चहा नाकातुन गेला असता!
आता हे सदाभाऊ कोण? तर हे सदाभाऊ खोत! ग्रामीण भागात स्पष्ट भाषणं करणारे, एकेकाळचे शेतकऱ्यांचे लाडके नेते! त्यांच्या भाषणात गावपणाचा गंध असायचा आणि वास्तवाचा वास! पण आज सदाभाऊंच्या बोलण्यात एक वेगळाच “वंगाळ गंध” जाणवतोय. “सर्जिकल स्ट्राईक” हे म्हणताना ते विसरलेत की, सभागृह हे युद्धभूमी नसून लोकशाहीचा मंदिर आहे.
राडा आणि रक्षण
विधानसभेत नुकताच जो धिंगाणा झाला, तो पाहून एक बायको नवऱ्याला म्हणाली, “ह्यांचं बघा, आमच्या भांडणातसुद्धा इतका आवाज होत नाही!”
सभागृहात आमदारांनी हातघाई केली, बूटफेक झाली, आणि सगळ्यात वाईट म्हणजे, काही आमदारांनी बाहेरून बॉडीगार्ड म्हणून गुंड आणल्याचं आरोपांनी स्पष्ट केलं.
मग प्रश्न असा पडतो की, हे ‘सर्जिकल स्ट्राईक’ हेच का?
सदाभाऊ खोत हे गोपीचंद पडळकर यांचे जुने मित्र. हे दोघे एकाच राजकीय रंगात रंगलेले. त्यामुळे सदाभाऊंनी पडळकरांच्या राड्याचं “पडदा फाटलेला असला तरी त्याचा रंग कसा चांगला होता” असं समर्थन केल्यासारखं वाटतं!
सुसंस्कृतीचा खरा अर्थ
सदाभाऊ म्हणतात, “भाजप सुसंस्कृत पक्ष आहे.” पण हे सुसंस्कृतीचे नवे व्याख्यान आहे का? म्हणजे सभागृहात राडा करून त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणायचं?
मग उद्या एखादा विद्यार्थी वर्गात भांडण करेल आणि म्हणेल, “हे माझं सर्जिकल स्ट्राईक होतं!”
हा प्रकार म्हणजे थेट लोकशाहीची थट्टा आहे. हे जर सुसंस्कृतीचं परफॉर्मन्स असेल, तर महाराष्ट्रातील लोकांनी पानिपतच्या लढाईचं पुनरावलोकन सुरू केलं पाहिजे.
सदाभाऊंना एक विनंती
सदाभाऊ, तुमचं गावपण आम्हाला आवडायचं. तुमच्या भाषणातून आम्हाला आपला शेतकरी दिसायचा. पण आज तुम्ही त्या मातीतून निघून काहीतरी चमकदार राजकारणात हरवलात असं वाटतं. सत्य बोलणाऱ्या माणसांनी सत्तेपुढे झुकणे हे दु:खद आहे. “सर्जिकल स्ट्राईक” या शब्दाचा वापर करताना तो कुठे, कोणत्या संदर्भात वापरतोय हे पाहणं गरजेचं आहे. नाहीतर सभागृहातला राडा आणि सीमेवरचा सर्जिकल स्ट्राईक यात फरक राहणार नाही.
शेवटी एवढंच म्हणावं वाटतं:
“सभागृहात ‘सर्जिकल स्ट्राईक’(surgical-strike) नाही, तर ‘सेंसिबल स्पीच’ हवं असतं, सदाभाऊ!”
“गुंडगिरी महाराष्ट्राची सुसंस्कृती ठरू लागली, तर शिस्तीत चालणाऱ्या महाराष्ट्राचं काय होणार?”